मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थासाठी पदवी अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्षाच्या नियोजनाचे वार्षिक वेळापत्रक मुंबई विद्यापीठ प्रशासनाने जाहीर केले आहे. यामध्ये प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी, अंतर्गत व लेखी परीक्षा ते निकालाच्या नियोजनाचा समावेश आहे.

मुंबई विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकाप्रमाणे १३ जून २०२५ पासून सुरू झालेल्या शैक्षणिक वर्षातील मानव्यविज्ञान, वाणिज्य व विज्ञान शाखेतील अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या सत्र १ आणि द्वितीय वर्ष सत्र ३, तसेच एटीकेटीच्या परीक्षा या ९ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर २०२५ दरम्यान घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर प्रात्यक्षिक परीक्षा आणि अंतर्गत परीक्षांचे नियमाप्रमाणे नियोजन करायचे आहे.

विशेष म्हणजे १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत महाविद्यालयांनी समर्थ संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज व शुल्क भरायचे आहेत. तसेच २८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत या परीक्षांच्या मूल्यांकनाचा तपशील समर्थ संकेतस्थळावर निश्चित करण्यात आलेल्या कार्यपद्धतीनुसार उपलब्ध करून द्यायचा आहे.

पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या सत्र १ आणि द्वितीय वर्ष सत्र ३, तसेच एटीकेटीच्या परीक्षांसाठी महाविद्यालयांनी प्रश्नपत्रिका तयार करणे ते मूल्यांकन करून अंतरिम निकाल किंवा गुण जाहीर करण्याची प्रक्रिया विद्यापीठाच्या ३० जून रोजी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकाप्रमाणे करण्याचे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी केले आहे.

विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये डिजिटल गुणपत्रिका

महाविद्यालयांनी सादर केलेल्या तपशिलाच्या अनुषंगाने विद्यापीठामार्फत अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार असून विद्यापीठामार्फत विद्यार्थ्यांच्या डिजिटल गुणपत्रिका तयार केल्या जाणार आहेत. सदर गुणपत्रिका सर्वप्रथम समर्थ संकेतस्थळावरील विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानंतर डिजिलॉकरवर उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी पदवी अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक नियोजनाच्या वार्षिक वेळापत्रकानुसार २७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२५ हा मिड टर्म ब्रेक, २१ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२५ दिवाळी सुट्टी आणि हिवाळी सुट्टी ५ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ असल्याचे नियोजन करण्यात आले आहे.