योजनांवर नव्या कुलगुरूंची छाप; परदेशात शैक्षणिक संकुल सुरू करण्याची महत्त्वाकांक्षी योजना; तरतूद मात्र २० लाखांची
गेली अनेक वर्षे केवळ विविध प्रकारची दुरुस्तीची कामे व नव्या इमारतींच्या बांधकामांवर भर देणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या अर्थसंकल्पाचा चेहरामोहरा २०१६-१७ या वर्षांत नव्या कुलगुरूंच्या कार्यकाळात अक्षरश: बदलून गेला आहे. परदेशात शैक्षणिक संकुल, डिजिटल विद्यापीठ, रेल्वे संशोधन केंद्र, कौशल्य विकास केंद्र, मल्टी डायमेन्शनल विकास कार्यक्रम, व्यवसाय मागदर्शन केंद्र यांसारख्या तब्बल १६ योजनांसाठी आर्थिक तरतूद करून अर्थसंकल्पावर स्वत:ची छाप सोडण्याचा प्रयत्न कुलगुरू संजय देशमुख यांनी आपल्या पहिल्यावहिल्या अर्थसंकल्पात केला आहे. मात्र, अनेक महत्त्वाकांक्षी योजनांकरिता अत्यंत तुटपुंजी आर्थिक तरतूद करून या ढीगभर योजनांचे फलित नेमके काय, असा प्रश्न पडतो.
उदाहरणार्थ संयुक्त अरब अमिरात, दुबई यांसारख्या पश्चिम आशियाई देशांमधून शैक्षणिक संकुल (कॅम्पस) सुरू करण्याची मागणी होत असल्याने विद्यापीठाने त्याकरिता २० लाख रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे; परंतु हा निधी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांच्या दोन ते तीन परदेशवारीतच संपून जाईल इतका तुटपुंजा आहे. त्यातून परदेशात संकुल सुरू करायचे म्हटले तर विद्यापीठाला यूजीसीची (विद्यापीठ अनुदान आयोग) परवानगी लागते, मात्र नव्या विद्यापीठ कायद्यावर व इतर देशांच्या आर्थिक मदतीवर मदार ठेवून विद्यापीठाने परदेशी संकुलाचे गाजर यंदाच्या अर्थसंकल्पात दाखविले आहे.
स्मार्ट गाव योजना, मेक इन इंडिया केंद्र, स्वच्छ महाविद्यालय अभियान या योजनांच्या माध्यमांतून या अर्थसंकल्पावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छाप दिसून येते. अर्थात याच्या जोडीलाच विद्यापीठातील पाणथळीसारख्या संरक्षित जागेचा विकास, वनस्पतिशास्त्र उद्यान विकसित करण्याची योजना आखून जैव विज्ञान आणि पर्यावरण विषयाचे अभ्यासक असलेल्या कुलगुरूंनी अर्थसंकल्पावर आपली छाप सोडली आहे.

महत्त्वाचे..
’ झाराप, पालघर येथील कौशल्य विकास केंद्रांकरिता २ कोटी
’ नवी मुंबईत विद्यार्थी मार्गदर्शन केंद्राकरिता १० लाख ’ रेल्वे संशोधन केंद्रासाठी १० लाख ’ स्वच्छ महाविद्यालय योजनेकरिता ५० लाखांची तरतूद

डॉ. स्वामिनाथन यांना डी.लिट
भारताच्या हरितक्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांना मुंबई विद्यापीठाची अत्यंत मानाची डी.लिट ही सर्वोच्च पदवी बहाल करण्यात येणार आहे. यासंबंधीचा ठरावही अधिसभेच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.
ही बांधकामे होणार
कलिनामध्ये अ‍ॅकॅडमिक स्टाफ कॉलेजच्या वसतिगृहाचे, हिंदी भाषा भवन, मल्टिपर्पज हॉल, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी निवासस्थानांचे बांधकाम, झाराप येथे सिंधू स्वाध्याय संस्था, कलिना व ठाणे उपकेंद्रात वसतिगृहे.