मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या पदवी स्तरावरील राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत बीकॉम सत्र ५ सह बीकॉमच्या स्वयंअर्थसहाय्यित नऊ अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे प्रवेशपत्र महाविद्यालयांच्या लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. या परीक्षांना ६ ऑक्टोबर २०२६ पासून सुरुवात होणार आहे. परीक्षेसाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचेच प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले असून, प्रक्रिया पूर्ण न केलेल्या विद्यार्थ्यांना प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

६ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या परीक्षांमध्ये बॅचलर ऑफ कॉमर्सच्या अकाउंटिंग अँड फायनान्स, बँकिंग अँड इन्शुरन्स, ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट, फायनान्शियल मार्केट, इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट, मॅनेजमेंट स्टडीज आणि बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (ई.एम.ई.) या अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा समावेश आहे. प्रवेशपत्र तयार होण्यासाठी विद्यार्थ्यांनी मॅन्डेट जनरेशन, अभ्यासक्रमाची निवड, परीक्षा अर्ज भरणे व त्याची पडताळणी आणि एबीसी आयडी लिंक करणे या अनिवार्य प्रक्रिया पूर्ण केलेल्या असणे आवश्यक आहे. यापैकी कोणतीही प्रक्रिया अपूर्ण असलेल्या विद्यार्थ्यांची हॉलतिकिटे अद्याप तयार करण्यात आलेली नाहीत. दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांनी आवश्यक प्रक्रिया अद्याप पूर्ण केलेली नाही, त्यांनी पुढील दोन दिवसांत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.

विद्यापीठाच्या सूचना

विद्यार्थ्यांनी त्यांच्या महाविद्यालयाशी संपर्क साधून परीक्षा अर्जाची स्थिती तपासावी तसेच एबीसी आयडी लिंकिंगसह इतर आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. महाविद्यालयांनी वेळेत प्रवेशपत्र द्यावी महाविद्यालयांनी त्यांच्या लॉगिनवर उपलब्ध प्रवेशपत्रांची पडताळणी करून ती संबंधित विद्यार्थ्यांना वेळेत उपलब्ध करून द्यावीत, असेही विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यावरील परीक्षा केंद्र, विषय आणि इतर तपशील तपासून घ्यावेत असेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.