मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेच्या तिसऱ्या वर्षाच्या सहाव्या सत्राच्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचा प्रकार उघडकीस आला. प्रश्नपत्रिका फुटल्याचा प्रकार निदर्शनास आल्याच्या घटनेला आठवडा उलटल्यानंतरी अद्याप याबाबत कोणताही ठोस गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही. वांद्रे येथील आर. डी. नॅशनल महाविद्यालयात १५ एप्रिल रोजी घडलेल्या या घटनेनंतर काही विद्यार्थ्यांवर थातुरमातूर कारवाई करून जबाबदार यंत्रणेविरोधात कोणतेही ठोस पाऊल न उचलल्याने आता विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. विद्यापीठाने गोपनीयतेचे कारण पुढे करत याबाबत अधिक भाष्य करण्यास नकार दिला.
सध्या मुंबई विद्यापीठाच्या विविध विषयांच्या परीक्षा विविध महाविद्यालयांमध्ये सुरू आहेत. यापैकी वांद्रे येथील आर. डी. नॅशनल महाविद्यालयात १५ एप्रिल रोजी बीकॉमच्या तिसऱ्या वर्षाच्या शेवटच्या म्हणजेच सहाव्या सत्राच्या तीन प्रश्नपत्रिका प्रत्यक्ष परीक्षेआधीच विद्यार्थ्यांच्या हाती आल्या होत्या. या प्रकरणी विद्यापीठाने तातडीने समिती नेमून चौकशी सुरू केली.
चौकशीबाबत संदिग्धता
या समितीने चौकशी करून आर. डी. नॅशनल महाविद्यालयाच्या सहा विद्यार्थ्यांवर कारवाई केली. पण अशा कोणत्याही गैरप्रकाराशिवाय परीक्षा पार पाडण्याची जबाबदारी असलेले महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक यांची चौकशी झाली की नाही, याबाबत संदिग्धता असल्याचा आरोप अभाविपचे मुंबई महानगर मंत्री प्रशांत माळी यांनी केला.
संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी
हा प्रकार उलटून आता आठवडा होत आला, तरीही विद्यापीठाने या समितीचा अहवाल जाहीर केलेला नाही. तसेच या प्रकरणी गुन्ह्याचीही नोंद झालेली नाही. या गैरप्रकारात फक्त विद्यार्थीच सहभागी होते, असे विद्यापीठाचे म्हणणे आहे का, असा प्रश्नही संघटनेतर्फे उपस्थित करण्यात आला. परीक्षा नियंत्रक, संबंधित प्राचार्य, महाविद्यालय प्रशासन या सर्वांचाच सहभाग असल्याशिवाय हा प्रकार घडणार नाही. त्यामुळे या प्रकरणाशी संबंधित विद्यार्थ्यांसह या सर्वांविरोधातही गुन्हा नोंदवला पाहिजे, अशी कठोर भूमिका माळी यांनी मांडली.
प्रशासन नियमानुसार कारवाई करणार
या प्रकरणी आर. डी. नॅशनल महाविद्यालयाच्या प्राचार्य नेहा जगतानी यांच्याशी वारंवार संपर्क साधला. मात्र त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. याबाबत विद्यापीठ प्रशासनाला विचारले असता, या प्रकरणाची चौकशी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. या गोष्टी गोपनीय असल्याने जाहीर वाच्यता करणे योग्य नाही. या प्रकरणात दोषी आढळलेल्यांवर विद्यापीठ नियमानुसार कारवाई करेल, असेही विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले.
