मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्राने (सीडीओई) काही दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या एमएमएसच्या निकालावरून वादंग झाल्यानंतर आता पुन्हा प्रथम वर्ष बीकॉम आणि बीएच्या निकालाने नवा वाद निर्माण झाला आहे. बीकॉम व बीएची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी ८० टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सीडीओईची परीक्षा प्रणाली, मूल्यमापन पद्धतीबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे व संतापाचे वातावरण पसरले आहे.

मुंबई विद्यापीठाच्या सीडीओईने जाहीर केलेल्या निकालानुसार, बीकॉमच्या पहिल्या सत्राच्या परीक्षेला २ हजार ५४३ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २ हजार ८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, ४५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्याचप्रमाणे बीएच्या पहिल्या सत्राची परीक्षा २ हजार २२४ विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यापैकी १ हजार ७६४ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असून, फक्त ४६० विद्यार्थ्यांना यश मिळाले. सीडीओईमध्ये शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी नोकरी, व्यवसाय किंवा अन्य जबाबदाऱ्या सांभाळून शिक्षण पूर्ण करत असतात. त्यामुळे परीक्षा आणि निकालातील विलंब किंवा प्रक्रियेतील गोंधळाचा त्यांच्या करिअरवर परिणाम होण्याची शक्यता आहे. विद्यापीठाच्या या गैरकारभाराबाबत विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

शैक्षणिक साहित्य वेळेवर न मिळणे, परीक्षांबाबतची माहिती शेवटच्या क्षणी देणे, उत्तरपत्रिकांचे योग्य मूल्यमापन न होणे अशा अनेक तक्रारी सातत्याने करण्यात येत असूनही त्याकडे विद्यापीठाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले. या घटनेची दखल घेत अधिसभा सदस्य प्रदीप सावंत, धनराज कोहचाडे, तसेच माजी अधिसभा सदस्य राजन कोळंबकर यांनी कुलसचिव प्रसाद करांडे यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी अनुत्तीर्ण होण्यामागे अध्यापनातील त्रुटी, उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन किंवा परीक्षा व्यवस्थापनातील गोंधळ कारणीभूत आहे का, याचा शोध घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

विद्यापीठाचे म्हणणे…

एका किंवा अधिक विषयांमध्ये विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असल्यास त्यांना अनुत्तीर्ण असा शेरा दिला जात आहे. मात्र या विद्यार्थ्यांना दुसऱ्या सत्रात प्रवेश दिला जात आहे. प्रथम वर्षातील सर्व एटीकेटी प्रलंबित असतानाही पुढील वर्षात विद्यार्थ्याला प्रवेश देण्याची तरतूद असल्याने विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये, असे मुंबई विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नसून, एटीकेटी परीक्षा २५ ऑगस्टपासून घेण्यात येणार आहे. बीएचा निकाल गेल्या वर्षाइतकाच असून बीकॉमचा निकाल मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे ५ टक्क्यांनी सुधारल्याचाही दावा करण्यात आला आहे.