मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राची (सीडीओई) पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रमांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २८ मे २०२६ पासून सुरू करण्यात आली. दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सर्व पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी किमान पात्रताधारकांना थेट प्रवेशाची संधी उपलब्ध करण्यात येत आहे.
काही अडचणींमुळे महाविद्यालयीन शिक्षण औपचारिक शिक्षण पद्धतीतून पूर्ण करता येत नसलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण पद्धतीमुळे शिक्षणाची दालने खुली झाली आहेत. २८ मेपासून सुरू करण्यात आलेल्या या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश अर्ज भरता येणार असून विषय निवड आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया लवकरच उपलब्ध करण्यात येणार आहे, असे संचालक प्रा. शिवाजी सरगर यांनी सांगितले.
पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील या सर्व अभ्यासक्रमांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया https://mucdoeadm.samarth.edu.in/ या संकेत स्थळावरून करता येणार आहे. प्रवेश प्रक्रियेसंबधातील सर्व तपशील विद्यापीठाच्या https://cdoe.uom.edu.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहेत. सीडीओईमार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व अभ्यासक्रमांसाठी तज्ज्ञ व अनुभवी पूर्णवेळ प्राध्यापक या संस्थेत उपलब्ध आहेत.
या अभ्यासक्रमांना घेता येणार प्रवेश
पदवी स्तरावरील अभ्यासक्रमांमध्ये बीए (इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल, ग्रामीण विकास, मराठी, हिंदी, आणि इंग्रजी), बीकॉम ( कॉमर्स, अकाऊटंसी, आणि बीझनेस मॅनेजमेंट), बीकॉम (अकाऊंट अँड फायनान्स), बीएस्सी (माहिती तंत्रज्ञान), बीएस्सी (संगणकशास्त्र) या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रमांमध्ये एम.ए. (इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, शिक्षणशास्त्र, संज्ञापन आणि पत्रकारिता, जनसंपर्क); एम. कॉम. (ॲडव्हान्स अकाउंटन्सी), एम. कॉम. (बिझनेस मॅनेजमेंट), एम.एस्सी. (गणित) एम.एस्सी. (माहिती तंत्रज्ञान), एम.एस्सी. (संगणकशास्त्र) एमएमएस, एमसीए या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युअट डिप्लोमा इन फायन्साशिअल मॅनेजमेंट (पीजीडीएफएम) व डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट (डीएसएम) या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. दुहेरी पदवीचा पर्यायही दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्रात उपलब्ध करण्यात आला आहे.
एम.ए. समाजशास्त्र ऑनलाईन पद्धतीने
दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्रात मागील शैक्षणिक वर्षापासून एम. ए. समाजशास्त्र हा अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आला आहे. या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये म्हणजे प्रवेश प्रक्रिया ते परीक्षा ही सर्व प्रकिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे. कोणत्याही पात्रताधारक विद्यार्थ्यांना कुठूनही या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार आहे.
एमएमएस, एमसीएची प्रवेश परीक्षाही लवकरच
सीडीओईमार्फत चालविण्यात येणाऱ्या एमएमएस आणि एमसीए या अभ्यासक्रमांचे प्रवेश हे प्रवेश परीक्षेद्वारे केले जात असून या दोन्ही अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा लवकरच ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे.
