मुंबई : दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्रामार्फत (सीडीओई) चालविण्यात येत असलेल्या मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज् (‘एमएमएस’) व मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन (एमसीए) या दोन वर्षीय अभ्यासक्रमांसाठी अतिरिक्त ऑनलाइन प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी याआधी प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज केले नव्हते, तसेच ज्या विद्यार्थ्यांना यापूर्वीची ऑनलाइन प्रवेश परीक्षा देणे शक्य झाले नाही, अशांना हा दिलासा असेल. अतिरिक्त ऑनलाइन परीक्षा १६ ऑगस्ट रोजी घेण्यात येईल.
‘सीडीओई’मार्फत घेण्यात आलेल्या ‘एमएमएस’ व ‘एमसीए’ अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा अनेक विद्यार्थ्यांना देता आली नाही. शिवाय, अनेक विद्यार्थ्यांना वेळेत अर्ज करता आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान लक्षात घेऊन विद्यापीठाने या दोन्ही अभ्यासक्रमांची पुन्हा ऑनलाइन प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या अतिरिक्त ऑनलाइन प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना १० ऑगस्टपर्यंत https://mucdoeadm.samarth.edu.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करता येतील.
अतिरिक्त ऑनलाइन प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी दिलेल्या कालावधीत ऑनलाइन अर्ज सादर करावा, असे आवाहन दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे संचालक प्रा. शिवाजी सरगर यांनी केले आहे.
‘एमएमएस’ व ‘एमसीए’ या दोन्ही अभ्यासक्रमांना ‘यूजीसी’ व ‘एआयसीटीई’ची मान्यता आहे. दोन्ही अभ्यासक्रमांच्या पात्रता, शुल्क, प्रवेश परीक्षेसंबंधातील अधिक तपशील मुंबई विद्यापीठाच्या ‘सीडीओई’च्या https://cdoe.uom.edu.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षांपासून ‘एआयसीटीई’ व ‘यूजीसी’ने ‘सीडीओई’च्या माध्यमातून ‘एमएमएस’ अभ्यासक्रमासाठी परवानगी दिली असून हा अभ्यासक्रम ‘एमबीए’ अभ्यासक्रमाच्या समकक्ष आहे. एचआर, फायनान्स व मार्केटिंग या तीन विषयांत ‘एमएमएस’ अभ्यासक्रम करता येतो. ‘एमसीए’ हा दोन वर्षांचा सुधारित अभ्यासक्रम आहे.
