मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्रामार्फत (सीडीओई) चालविण्यात येत असलेल्या मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज् (एमएमएस) आणि मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन (एमसीए) या दोन वर्षीय अभ्यासक्रमांच्या ऑनलाईन प्रवेश परीक्षेसाठी अर्ज भरण्यास विद्यार्थ्यांना १४ जुलैपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. या दोन्ही अभ्यासक्रमांसाठी १९ जुलै रोजी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश परीक्षा होणार आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेसाठीचा अर्ज https://mucdoeadm.samarth.edu.in या संकेतस्थळावर सादर करता येणार आहे.

एआयसीटीई व यूजीसीने २०२१-२२ या शैक्षणिक वर्षांपासून सीडीओईच्या माध्यमातून एमएमएस हा अभ्यासक्रम राबविण्यास परवानगी दिली आहे. हा अभ्यासक्रम एमबीए अभ्यासक्रमाच्या समकक्ष आहे. एचआर, फायनान्स व मार्केटिंग या तीन विषयात एमएमएस हा अभ्यासक्रम करता येतो. एमसीए हा दोन वर्षांचा सुधारित अभ्यासक्रम आहे. या दोन्ही अभ्यासक्रमांसाठी अर्ज करण्याकरीता विद्यार्थ्यांना १४ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ही अंतिम मुदत असणार आहे. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन पद्धतीने १९ जुलै रोजी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेसाठीचा अर्ज https://mucdoeadm.samarth.edu.in या संकेतस्थळावर सादर करता येणार आहे. एमएमएस आणि एमसीए हे दोन्ही अभ्यासक्रम युजीसी आणि एआयसीटीई मान्यताप्राप्त आहेत. दोन्ही अभ्यासक्रमांच्या पात्रता, शुल्क, प्रवेश परीक्षेसंबंधातील अधिक तपशील मुंबई विद्यापीठाच्या सीडीओईच्या https://cdoe.uom.edu.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी विहित कालावधीत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे संचालक प्रा. शिवाजी सरगर यांनी केले आहे.

एमएमएस या अभ्यासक्रमासाठी ७२० एवढी प्रवेश क्षमता असून एमसीए या अभ्यासक्रमासाठी २००० एवढी प्रवेश क्षमता आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला नोंदणी करण्यासाठी १२ जून रोजी सुरुवात झाली. यावेळी विद्यार्थ्यांना ३० जूनपर्यंत नोंदणी करण्यासाठी मुदत दिली होती. त्यानंतर पुन्हा मुदतवाढ देत ७ जुलैपर्यंत अर्ज नोंदणी करण्यास मुभा दिली होती. आता १४ जुलैपर्यंत दिलेली मुदत ही अंतिम मुदत असणार आहे. त्यानंतर १९ जुलै रोजी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे.