मुंबई : ब्रिटनमधील डी मॉन्टफोर्ट युनिव्हर्सिटी लीसेस्टरसोबत मुंबई विद्यापीठामध्ये नुकताच शैक्षणिक सामंजस्य करार केला असून यामुळे दोन्ही विद्यापीठांदरम्यान दुहेरी पदवी, सह पदवी, ऑनलाईन व प्रत्यक्ष इंटर्नशिप आणि प्रगत ज्ञानशाखात अध्ययन व संशोधनाच्या विविध संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच विद्यार्थी-शिक्षक आदान – प्रदान, विविध विद्याशाखातील शैक्षणिक कार्यक्रम, सह सांस्कृतिक कार्ये आणि शैक्षणिक साहित्य – संसाधन निर्मिती व हस्तांतरण अशा वैविध्यपूर्ण क्षेत्रातही काम करण्यात येणार आहे. तसेच या करारानुसार दोन्ही विद्यापीठातील प्राध्यापक आणि संशोधक परिषदा, कार्यशाळा आणि व्याख्यानात सहभागी होऊ शकतील. त्याचबरोबर अध्ययन आणि संशोधनासाठी एकत्रिक कार्यही करू शकतील.

ब्रिटनमध्ये आयोजित ‘गोईंग ग्लोबल’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करत असलेले प्र कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे आणि डी मॉन्टफोर्ट युनिव्हर्सिटीच्या कुलगुरू प्रा. केटी नॉर्मिंग्टन यांच्या उपस्थित या सामंजस्य कराराचे हस्तांतरण करण्यात आले.राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना अनुभवात्मक आणि कौशल्य प्रशिक्षण, प्रगत ज्ञानशाखेत अध्ययन व संशोधनाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी मुंबई विद्यापीठाने युरोप, आशिया आणि अमेरिकेतील विविध २३ नामांकित उच्च शिक्षण संस्था आणि विद्यापीठांशी शैक्षणिक सामंजस्य करार केले आहेत.

वैश्विक ज्ञानाची देवाण-घेवाण प्रक्रियेमुळे विविध देशांतील शिक्षण प्रणालींमध्ये विकसित होत असलेल्या परस्पर संवादाद्वारे विद्यार्थ्यांना या कराराअंतर्गत फायदा होणार असून, यामुळे सर्वोत्कृष्ट शैक्षणिक आणि संशोधन पद्धतींच्या सामायिकरणास प्रोत्साहन मिळू शकेल, असे याप्रसंगी प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे यांनी सांगितले.१९९२ मध्ये स्थापन झालेले डी मॉन्टफोर्ट युनिव्हर्सिटी लीसेस्टर, यूके हे जागतिक दर्जाचे, नाविन्यपूर्ण व करिअर केंद्रित शिक्षण देणारे सार्वजनिक विद्यापीठ म्हणून ओळखले जाते. अत्याधुनिक कॅम्पस, तज्ज्ञ प्राध्यापक, उद्योगसंबंध आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थी सहाय्यामुळे हे विद्यापीठ सर्जनशीलता, संशोधन व व्यावसायिक यशासाठी ओळखले जाते.