मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०च्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाच्या विद्या परिषदेने विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेअंतर्गत अभियांत्रिकीत ‘ऑनर्स विथ रिसर्च’ पदवी अभ्यासक्रमाला मंजुरी दिली. हा अभ्यासक्रम २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार आहे. या अभ्यासक्रमामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना केवळ तांत्रिक शिक्षण न मिळता त्यांच्यात संशोधनाची दृष्टी, नवोन्मेषाची वृत्ती व चिकित्सक विचारक्षमता विकसित करण्यास मदत होणार आहे.
या अभ्याक्रमामुळे विद्यार्थ्यांना संशोधन पद्धती, शोधनिबंध लेखन, संशोधन सादरीकरण व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संशोधन नियतकालिकांमध्ये प्रकाशनाचा अनुभव मिळेल व त्यांना उच्च शिक्षण, संशोधन संस्था तसेच उद्योग क्षेत्रातील भविष्यातील संधींसाठी सक्षम होण्यास मदत होईल. या उपक्रमामुळे बी.ई.च्या पदवीसोबत विद्यार्थ्यांना स्वतंत्र संशोधन प्रकल्पावर प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळणार आहे.
नियमित प्रवेशित विद्यार्थ्यांना पहिल्या ते पाचव्या सत्रापर्यंत कोणताही अनुशेष (बॅकलॉग) नसणे व पाचव्या सत्रात किमान ७.५ सीजीपीआय आवश्यक आहे. थेट द्वितीय वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी तिसरे ते पाचवे सत्र अनुशेषमुक्त असणे व पाचव्या सत्रात ७.५ सीजीपीआय आवश्यक असेल.
सहाव्या सत्रात विद्यार्थ्यांना संशोधन प्रस्तावाची रूपरेषा सादर करावी लागेल. संबंधित अभ्यास मंडळाकडून त्याचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना संशोधनाची प्राथमिक तयारी पाचव्या सत्रापासून महाविद्यालय स्तरावर करता येणार आहे.
विद्यार्थ्यांना ‘ऑनर्स विथ रिसर्च’साठी बी.ई.च्या नियमित क्रेडिट्सव्यतिरिक्त १८ अतिरिक्त क्रेडिट्स पूर्ण करावे लागतील. यात संशोधन पद्धतीचे ४, रिसर्च पब्लिकेशनचे १० व अंतिम मूल्यांकनाचे ४ क्रेडिट्स असतील. विद्यार्थ्यांना दोन परिषद शोधनिबंध किंवा स्कोपस -इंडेक्स्ड/ वेब ऑफ सायन्स नियतकालिकातील एक शोधनिबंध सादर करावा लागेल. अंतिम संशोधन प्रकल्पाचे मूल्यांकन पीएच.डी. पात्र बाह्य परीक्षकाकडून व्हायवा व्होसच्या माध्यमातून करण्यात येईल. विशेष म्हणजे संशोधन प्रकल्प हा वैयक्तिक स्वरूपाचा असेल.
‘ऑनर्स विथ रिसर्च’ करणाऱ्या विद्यार्थ्यांना एकाच वेळी ऑनर्स वा एमर्जिंग मायनर करता येणार नाही. तसेच एईडीपीमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना हा पर्याय उपलब्ध होणार नाही. विद्यार्थ्यांना चौथ्या वर्षात या अभ्यासक्रमातून माघार घेण्याची मुभा असून, नियमित अभ्यासक्रम पूर्ण केल्यास त्यांना सामान्य बी.ई. पदवी मिळेल.
पीएच.डी. मार्गदर्शकांचे मार्गदर्शन
या अंतर्गत केवळ पीएच.डी. मार्गदर्शक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू शकतील. एका प्राध्यापकास जास्तीत जास्त पाच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता येईल. मान्यताप्राप्त संशोधन केंद्र किंवा पीएच.डी. मार्गदर्शक असलेल्या महाविद्यालयांनाच हा अभ्यासक्रम सुरू करता येणार आहे. पीएच.डी. केंद्र असलेल्या महाविद्यालयांना १० विद्यार्थ्यांची आधारभूत प्रवेश क्षमता आणि प्रत्येक पीएच.डी. मार्गदर्शकांसाठी पाच अतिरिक्त विद्यार्थ्यांची क्षमता राहील. अर्जांची संख्या उपलब्ध जागांपेक्षा अधिक असल्यास प्रवेश गुणवत्तेच्या आधारे दिला जाणार आहे.
अभियांत्रिकी शिक्षण हे केवळ तांत्रिक ज्ञान आणि पदवीपुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची दृष्टी, नवोन्मेषाची वृत्ती विकसित करणे आवश्यक आहे. ‘ऑनर्स विथ रिसर्च’ या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पदवीच्या शिक्षणासोबत स्वतंत्र संशोधन प्रकल्पावर काम करण्याची, संशोधन पद्धती आत्मसात करण्याची आणि शोधनिबंध प्रकाशित करण्याची संधी मिळणार आहे. – प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ
