मुंबई : ग्रामपंचायत निवडणुका आणि राज्य सामाईक प्रवेश परीक्षेमुळे मुंबई विद्यपाीठाकडून उन्हाळी सत्र २०२६ च्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने १८ एप्रिल रोजी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले होते. मात्र ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमुळे काही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र सीईटीच्या परीक्षांमुळे मुंबई विद्यापीठाने त्या परीक्षांच्या पुढील सुधारित तारखा जाहीर केल्या आहेत.
नव्याने जाहीर करण्यात आलेल्या सुधारित वेळापत्रकाची माहिती तातडीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश मुंबई विद्यापीठ प्रशासनाने सर्व विभागप्रमुख, ठाणे व कल्याण उपकेंद्राचे संचालक, दूरस्थ शिक्षण विभाग (सीडीओई) तसेच संलग्न महाविद्यालयांचे प्राचार्य यांना दिले आहेत. परीक्षा वारंवार पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सुधारित वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार असून त्यांना परीक्षेची तयारी करण्याचे नियोजन करणे शक्य होणार आहे.
सुधारित परीक्षा वेळापत्रक मुंबई विद्यापीठाकडून १८ एप्रिल रोजी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार सहा परीक्षा या २८ एप्रिल रोजी होणार होती. मात्र ग्रामपंचायत निवडणुकांमुळे या परीक्षा ९ मे रोजी घेण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र अनेक विद्यार्थी हे सीईटी परीक्षा देणार असल्याने या कालावधीत असलेल्या सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तारखांमध्ये बदल करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे मुंबई विद्यापीठाने नव्याने परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार २ मे, ६ मे, ११ मे, १४ मे आणि १५ मे रोजी घेण्यात येणार आहे.
वेळापत्रकात बदल असला तरी वेळ कायम विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बाब म्हणजे परीक्षेची वेळ पूर्वीच्या वेळापत्रकानुसारच कायम ठेवण्यात आली आहे. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र उर्वरित परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच पार पडणार असल्याचे मुंबई विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आले आहे.
