मुंबई विद्यापीठाने परीक्षा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या वार्षिक शुल्कातही वाढ होणार आहे. ही वाढ झाल्यानंतर विविध परीक्षांसाठीचे शुल्क ५०० रुपयांपासून ते दोन हजार रुपयांपर्यंत आकारले जाणार आहे. विद्यापीठाने सुरू केलेल्या ऑनलाइन गुणपत्रिका तपासणी प्रक्रियेमुळे हे शुल्क वाढल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मुंबई विद्यापीठातर्फे परीक्षा प्रक्रियेतील येणारा खर्च आणि त्या संबंधित घटकांना देण्यात येणारे मानधन या संदर्भात विचार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने दिलेल्या अहवालात उत्तरपत्रिका तपासनीस आणि निरीक्षक यांच्या मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्या प्रस्तावावर नुकत्याच झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बठकीत सविस्तर चर्चा करून मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे येत्या शैक्षणिक वर्षांपासून विद्यापीठाकडून उत्तरपत्रिका तपासणी ऑनलाइन करण्यात येणार असल्याने खर्चात वाढ होणार असल्याने परीक्षा शुल्कवाढीचा निर्णय विद्यापीठाने घेतला. विद्यापीठाच्या या निर्णयानुसार पदवी, पदव्युत्तर आणि एमफिल, पीएचडी अशा सगळ्या अभ्यासक्रमांसाठी ही शुल्कवाढ लागू होणार आहे.

या वाढीनुसार ज्या अभ्यासक्रमांसाठी सध्या ६५० रुपये शुल्क घेतले जाते, ते आता एक हजारापर्यंत आकारण्यात येणार आहे. या वाढीच्या निर्णयानुसार बीए, बीकॉम, बीएस्सी अशा पारंपरिक अभ्यासक्रमाचे ५०० ते एक हजार रुपयांपर्यंतचे शुल्क दोन हजार ते तीन हजारांवर जाणार आहे. या निर्णयाबद्दल सांगताना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम.ए.खान म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून विद्यापीठाच्या परीक्षा शुल्कात वाढ केलेली नाही. असे असले तरी परीक्षा प्रक्रियेचा खर्चही अनेक पटींनी वाढला आहे. या पाश्र्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, विद्यार्थी संघटनांकडून या शुल्कवाढीला विरोध होत आहे.