मुंबई : मुंबई आणि उपनगरांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने सोमवारी (६ जुलै) आयोजित केलेल्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या. भारतीय हवामान विभागाने मुंबईसह परिसरासाठी अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून परीक्षा व मूल्यमापन मंडळाने सोमवारी परिपत्रक जारी केले आहे.

मुंबई विद्यापीठाच्या विविध पदवी, पदव्युत्तर तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा सोमवारी आयोजित करण्यात आल्या होत्या. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघर परिसरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचणे, वाहतूक विस्कळीत होणे आणि लोकल रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचताना अडचणी निर्माण होऊ नयेत आणि त्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य मिळावे, यासाठी विद्यापीठ प्रशासनाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक लवकरच मुंबई विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी वेळोवेळी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील सूचना तपासाव्यात, असे आवाहनही विद्यापीठाने केले आहे.

मुंबई विद्यापीठाच्या इमारतीचे दगड कोसळले मुंबई विद्यापीठ फोर्ट परिसरातील बँक ऑफ बडोदा समोरील प्रवेशद्वार २ मेपासून दुरुस्तीच्या कारणास्तव बंद करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयासमोरील प्रवेशद्वार सर्वांसाठी खुले केले आहे. मुंबईत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे या प्रवेशद्वाराजवळील इमारतीच्या काही भागाचे दगड सोमवारी कोसळले. यावेळी कोणीही विद्यार्थी, पालक, कर्मचारी अथवा पादचारी जखमी झाले नाहीत. याबाबत युवासेना सिनेट सदस्यांनी विद्यापीठ प्रशासनाशी संपर्क साधला असता विद्यापीठाच्या वास्तूची डागडुजी करण्यासाठी पुरातत्व विभागाची परवानगी आवश्यक आहे. त्यामुळे दोन महिने उलटले तरीही काम सुरु झाले नाही. तसेच विद्यापीठ आणि परिसरातील वृक्ष छाटणी करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेशी पत्रव्यवहार केला असल्याचे सांगितले.