मुंबई : मुंबई विद्यापीठातील विविध शैक्षणिक पदांसाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेसाठी अर्ज सादर करण्याच्या अंतिम कालावधीत वाढ करण्यात आली आहे. विविध पदांचे ऑनलाइन अर्ज २ जानेवारीपर्यंत, कागदपत्रे ९ जानेवारीपर्यंत स्वीकारले जाणार असून यासंदर्भातील अधिसूचना विद्यापीठ प्रशासनाने प्रसिद्ध केली आहे.

मुंबई विद्यापीठाने यापूर्वी ४ नोव्हेंबरच्या दुरुस्ती अधिसूचनेनुसार, तसेच ३ डिसेंबरच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, विद्यापीठातील अधिष्ठाता, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, तसेच सहाय्यक प्राध्यापक या विविध पदांसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १८ डिसेंबर अशी निश्चित केली होती. मात्र, उमेदवारांची मागणी आणि प्रशासकीय कारणांचा विचार करता ही मुदत आता १८ डिसेंबरऐवजी २ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ पर्यंत वाढविण्यात आल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले.

तसेच, ऑनलाइन अर्जासोबत सादर करण्यात येणाऱ्या शैक्षणिक, अध्यापन आणि संशोधन प्रमाणपत्र (एटीआर) आदी कागदपत्रांच्या तीन प्रतींसह ऑनलाइन अर्जाची प्रत मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट परिसरातील आवक विभागाच्या कक्ष क्रमांक २५ मध्ये जमा करण्याची अंतिम तारीखही वाढवण्यात आली आहे. ही मुदत आता ९ जानेवारीपर्यंत (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) निश्चित करण्यात आली आहे. विद्यापीठ प्रशासनाने सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी सुधारित तारखांची नोंद घ्यावी, असे आवाहन केले आहे. ही अधिसूचना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांनी जारी केली.