मुंबई : बदलते तंत्रज्ञान आणि वेगाने विकसित होत असलेले कार्यक्षेत्र लक्षात घेता विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळविण्यापुरते मर्यादित न राहता संशोधन, नवकल्पना, उद्योगाभिमुख कौशल्ये आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळविण्यावर भर द्यावा. शिक्षणासोबत उपलब्ध असलेल्या फेलोशिप आणि अप्रेंटिसशिपच्या संधींचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी आपल्या स्वप्नांना कर्तृत्वाची जोड द्यावी, असे आवाहन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी केले.
मुंबई विद्यापीठाच्या श्रीमान बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्राच्या वतीने ‘फेलोशिप उडाण – स्वप्नांना संधीची जोड’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, सी. ए. प्रतीक कर्पे, व्यवस्थापन परिषद सदस्य शीतल शेठ देवरूखकर आणि विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी पीएएम फेलोशिप, सीएम फेलोशिप आणि मुंबई विद्यापीठाच्या महत्त्वाकांक्षी व्हिसी फेलोशिप या तीन फेलोशिप योजनांची माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांनी उपलब्ध संधींचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे वक्ते सी.ए. प्रतीक कर्पे यांनी ‘विकसित मुंबईच्या निर्मितीसाठी युवा पिढीला सुवर्णसंधी’ या संकल्पनेतून बीएमसी फेलोशिप कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली.
मुंबई शहराच्या विकासाशी संबंधित विविध क्षेत्रांमध्ये प्रत्यक्ष काम करण्याची, प्रशासकीय प्रक्रियेचा अनुभव घेण्याची आणि शहरासमोरील विविध प्रश्नांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना सुचविण्याची संधी या फेलोशिपच्या माध्यमातून युवा पिढीला मिळते, असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर त्यांनी सीएम फेलोशिपबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व्यवस्थापन परिषद सदस्य शीतल शेठ देवरूखकर यांनी कार्यक्रमाची संकल्पना विशद केली. विद्यार्थ्यांना शिक्षण, कौशल्य, अनुभव आणि संधी यांची सांगड घालून भविष्यातील करिअरसाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
कौशल्ये आणि रोजगारक्षमता विकसित करण्यास मदत कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज, त्रिमितीय मुद्रण, आभासी, संवर्धित व मिश्र वास्तव तसेच सेमीकंडक्टर तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या संशोधन व नवकल्पनांच्या संधींचाही यावेळी त्यांनी उल्लेख केला. शिक्षणासोबत अप्रेंटिसशिप आणि फेलोशिपचा अनुभव घेतल्यास विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कार्यविश्वाची ओळख होऊन कौशल्ये आणि रोजगारक्षमता विकसित करण्यास मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले.
