मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे दरवर्षी मराठी भाषा व साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ संशोधकांना दिला जाणारा ‘अ. का. प्रियोळकर ज्येष्ठ संशोधक पुरस्कार’ गिरीश प्रभुणे यांना प्रदान करण्यात आला. मुंबई विद्यापीठातर्फे आयोजित ‘मराठी भाषा गौरव दिन’ कार्यक्रमात कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते हा प्रतिष्ठित पुरस्कार देऊन गिरीश प्रभुणे यांना सन्मानित करण्यात आले.
‘मराठीच्या बोली लोक परंपरेतील ज्ञानाने समृद्ध असून, या पारंपारिक ज्ञानाला विज्ञानाचा आधार आहे, आपण याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हे ज्ञान दुर्लक्षित राहिले. हे ज्ञान भारतीय ज्ञान परंपरेचा महत्त्वाचा भाग असल्याचे मत गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केले.
मुंबई विद्यापीठाने मराठी भाषा व बोलींसाठी ‘मराठी भाषा व बोली परिपक्वता एआय मॉडेल’ प्रकल्प हाती घेतला असून २२ संशोधक प्राध्यापक व मराठी विभागप्रमुख डॉ. विनोद कुमरे यांच्या नेतृत्वात संशोधन व अभ्यासाचे काम करीत असल्याचे कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले. या प्रकल्पाचा प्रस्ताव लवकरच शासनाकडे सादर केला जाणार आहे. मुंबई विद्यापीठ मराठी भाषा ही ज्ञान व तंत्रज्ञानाची भाषा व्हावी या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मराठी विभागाकडून मराठी विभागाच्या संशोधन केंद्रातील पीएच.डी पदवी प्राप्त संशोधकांसाठी, उत्कृष्ट शोध प्रबंधाकरिता ‘अ.का.प्रियोळकर संशोधन पुरस्कार’ आणि मराठी विभागातील एम. ए. (मराठी) पदव्युत्तर पदवी परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास राजकवी भास्करराव रामचंद्र तांबे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मराठी विभागाकडून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून २६ फेब्रुवारी रोजी विविध विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग विभागप्रमुख डॉ. विनोद कुमरे यांनी केले तर आभार डॉ. अनिल सपकाळ यांनी मानले.
‘भारतीय ज्ञान प्रणाली’ पुस्तकाचे प्रकाशन
मुंबई विद्यापीठातर्फे ‘भारतीय ज्ञान प्रणाली’ (इंडियन नॉलेज सिस्टम- आयकेएस) या अभ्यासक्रमासाठी तयार केलेल्या मराठी पुस्तकाचे प्रकाशन गिरीश प्रभुणे यांच्या उपस्थित करण्यात आले. पुस्तकाचे मुख्य संपादक डॉ. माधव राजवाडे असून, संपादक म्हणून डॉ. प्रकाश मसराम यांनी कार्य केले आहे. मुंबई विद्यापीठाच्या १६९ स्थापना दिनाचे औचित्य साधून या पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले होते. मराठी आवृत्ती व संकलनासाठी डॉ. मंजिरी भावे आणि डॉ. श्रीरंग जोशी काम केले. या पुस्तकात आयुर्वेद, योग, भारतीय रसायनशास्त्र, नाट्यशास्त्र, प्राचीन क्रीडा परंपरा, युद्धनीती तसेच आर्यभट, सुश्रुत यांसारख्या प्राचीन विद्वानांचे योगदान यासारख्या विषयांचा समावेश आहे.
