मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत संशोधनपूरक, रोजगाराभिमुख आणि लवचिक शिक्षण पद्धतीला प्राधान्य देत मुंबई विद्यापीठच्या इतिहास विभागाने २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया जाहीर केली आहे. ऐतिहासिक वारसा जतन करत आधुनिक दृष्टिकोनातून संशोधक घडवण्याच्या उद्देशाने विभागाने विद्यार्थ्यांसाठी विविध वैशिष्ट्यपूर्ण पर्याय उपलब्ध केले आहेत.इतिहास विभागात विविध विषयांतील तज्ज्ञ प्राध्यापकांकडून विद्यार्थ्यांना नियमित अध्यापनासोबत संशोधन तसेच प्रशासकीय नोकरीतील संधींबाबत मार्गदर्शन केले जाते.
विभागात दर आठवड्याला आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष व्याख्यानमालेत इतिहासातील दुर्लक्षित पैलू, जागतिक, प्रादेशिक आणि स्थानिक इतिहास, तसेच आधुनिक संशोधन पद्धतींवर चर्चा करण्यासाठी देशभरातील नामवंत तज्ज्ञ आणि संसाधन व्यक्तींना निमंत्रित करण्यात येते. त्यामुळे विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील ऐतिहासिक घडामोडी आणि आधुनिक संशोधन तंत्रांची थेट ओळख होते.
पहिल्या वर्षानंतर बाहेर पडण्याचा पर्यायइतिहास विभागामार्फत विद्यार्थ्यांना मल्टिपल एन्ट्री-एक्झिट सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षानंतर पदव्युत्तर डिप्लोमा घेऊन बाहेर पडण्याचा पर्याय देण्यात आला असून एम.ए.च्या दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांचा सीजीपीए ७.५ पेक्षा अधिक आहे, त्यांच्यासाठी ‘बी.ए. इतिहास ऑनर्स विथ रिसर्च’ हा विशेष चार वर्षांचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.
प्रवेशासाठी पूर्वनोंदणी आवश्यक
संशोधनाची आवड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एम.ए.सह पीएच.डी. प्रवेशाची संधी उपलब्ध असून भारतासह जगभरातील विद्यार्थ्यांना येथे प्रवेश घेता येणार आहे. विद्यापीठाच्या विद्यानगरी कलिना कॅम्पस येथे शैक्षणिक व संशोधनासाठी आवश्यक सर्व सुविधा, समृद्ध डिजिटल ग्रंथालय, तसेच दुर्मिळ हस्तलिखितांचा संग्रह उपलब्ध आहे. शैक्षणिक, संशोधन, प्रशासकीय, वस्तुसंग्रहालयशास्त्र आणि पुरातत्व क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी एम.ए. (इतिहास) आणि ‘बी.ए. इतिहास ऑनर्स विथ रिसर्च’ अभ्यासक्रमासाठी पूर्वनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
कशी कराल नोंदणी
पूर्वनोंदणीसाठी विद्यापीठाच्या https://forms.gle/ybbsspLNCyVEGvjz7 आणि https://muadmission.samarth.edu.in या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहिती आणि शंका निरसनासाठी विभागातर्फे विशेष समुपदेशन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी इतिहास विभागाला प्रत्यक्ष भेट देऊन या सत्रांचा लाभ घ्यावा, असे आवाहन इतिहास विभागप्रमुख डॉ. लक्ष्मी साळवी यांनी केले आहे.
