मुंबई : पाली भाषा विभागाचे जतन व विकास, स्वतंत्र ‘पाली भवन’ इमारतीचे बांधकाम, विभागासाठी योग्य अनुदान, अण्णाभाऊ साठे विद्यार्थी वसतिगृहाचे नूतनीकरण आणि ३०० विद्यार्थ्यांसाठी नवे वसतिगृह आदी मागण्यांसाठी बौद्ध भिक्षू राजेश बलखंडे उर्फ भदंत विमांसा (५२) सहा महिन्यांपासून विद्यापीठामध्ये आंदोलन करत आहे. त्यांच्या समर्थनार्थ विविध सामाजिक व राजकीय संस्था विद्यापीठात येत आहेत. त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून विद्यापीठाने सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. माहितीपट दिग्दर्शक डॉ. आनंद पटवर्धन शनिवारी अचानक भदंत विमांसा यांना भेटण्यासाठी गेले असता विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना मुख्य प्रवेशद्वारावरच रोखले. या प्रकारामुळे मुंबई विद्यापीठाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
भदंत विमांसा सुमारे १९० दिवसांपासून मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात आंदोलन करत आहेत. पाली भाषा विभागाचे जतन व विकास, स्वतंत्र ‘पाली भवन’ इमारतीचे बांधकाम, विभागासाठी योग्य अनुदान, अण्णाभाऊ साठे विद्यार्थी वसतिगृहाचे नूतनीकरण आणि ३०० विद्यार्थ्यांसाठी नवे वसतिगृह बांधावे आदी मागण्यांसाठी ते आंदोलन करत आहेत. भदंत यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा, दलित पँथर सुवर्ण महोत्सव समन्वय समिती, जाती अंत संघर्ष समिती, पाली भाषा संवर्धन समन्वय समिती, ज्येष्ठ आंबेडकरी नेते, पाली अभ्यासक आदी विविध संघटना, नेते व कार्यकर्ते मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात येत आहेत. यामुळे विद्यापीठातील विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेत मुंबई विद्यापीठाने मागील काही महिन्यांपासून कलिना परिसराच्या सर्व प्रवेशद्वारांवर कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या परिसरामध्ये प्रवेश करणाऱ्या व्यक्तीची खातरजमा करूनच त्यांना आता सोडले जात आहे.
त्यातच २८ फेब्रुवारी रोजी मुंबई विद्यापीठाजवळील एका बुद्धविहारामधील कार्यक्रमाला माहितीपट दिग्दर्शक डॉ. आनंद पटवर्धन उपस्थित होते. मुंबई विद्यापीठाच्या उर्दू विभागाने फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र काही कारणास्तव हा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. त्यामुळे २८ फेब्रुवारी रोजी बुद्धविहारामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम संपल्यानंतर डॉ. आनंद पटवर्धन यांनी काही सहकाऱ्यांसोबत जाऊन भदंत विमांसा यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला. मात्र विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना मुख्य प्रवेशद्वारावरच रोखले आणि त्यांची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी भदंत विमांसा यांना भेटता येणार नाही, असे स्पष्ट करीत त्यांना विद्यापीठातील प्रवेश नाकारला.
पटवर्धन यांना प्रवेशद्वारावर रोखण्यात आल्यानंतर भदंत विमांसा यांनी प्रवेशद्वाराजवळ येऊन पटवर्धन यांची भेट घेतली. एकात्मतेचे प्रतीक म्हणून त्यांनी त्यांना गुलाबाचे फूल देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी भदंत यांनी आपल्या मागण्यांची माहिती पटवर्धन यांना दिली. तसेच त्यांच्यावर विद्यापीठाकडून होणाऱ्या अन्यायाची माहिती दिली. विद्यापीठाकडून खुल्या तुरुंगात ठेवल्याची भावना भदंत विमांसा यांनी व्यक्त केली. आपण विद्यार्थी हितासाठी लढा देत असल्याने माघार घेणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबई विद्यापीठाचे म्हणणे…
कलिना संकुलात विविध पदव्युत्तर शैक्षणिक विभागात जवळपास ५ हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विविध वसतिगृहांमध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी तसेच आंतरराष्ट्रीय विद्यार्थीही वास्तव्यास आहेत. त्याचबरोबर विविध प्रशासकीय विभागातील अधिकारी आणि प्राध्यापक त्यांच्या कुटुंबियांसह या संकुलातील सदनिकांमध्ये वास्तव्यास आहेत. कलिना संकुलात बेकायदेशीररित्या आंदोलन करणारे राजेश बलखंडे यांच्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे सर्व संबंधितांना विचारपूस करून प्रवेश दिला जातो. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात डॉ. आनंद पटवर्धन येणार आहेत याची कोणतीही पूर्वकल्पना विद्यापीठ प्रशासनास देण्यात आली नव्हती, त्यामुळे त्यांना परवानगी नाकारण्याचा प्रश्नच उद््भवत नाही. ते कलिना संकुलात येणार आहेत हे विद्यापीठास माहीत असते तर विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने त्यांचा सन्मान करून त्यांच्या पुढे विद्यापीठाचीही बाजू मांडली असती, अशी माहिती मुंबई विद्यापीठ प्रशासनाने निवेदनाद्वारे दिली.
