मुंबई : मुंबई विद्यापीठाने शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलून हरित ऊर्जा वापराच्या दिशेने आपली वाटचाल अधिक वेगवान केली आहे. कलिना संकुलात २०० किलोवॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. संकुलातील ६ इमारतींवर सुमारे १८७ किलोवॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक २० वॅट क्षमतेचे ८५ सौर स्ट्रीट लाईट्स बसविण्यात आले आहेत.

कलिना संकुलातील सौर ऊर्जा प्रकल्पामुळे संकुलाचा मोठा भाग अक्षय ऊर्जा स्त्रोतांवर चालणार असून वार्षिक वीज खर्चात लक्षणीय बचत होणार आहे. याशिवाय पर्यावरणाच्या दृष्टीने दरवर्षी कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा हेतूही साध्य केला जाणार आहे. या इमारतीमध्ये सौरऊर्जेच्या वापरामुळे महिन्याला ४ लाख रुपयांहून अधिक वीज खर्च कमी होणार आहे. २०० किलोवॅट क्षमतेच्या या सौर प्लांटमध्ये नेट मीटरिंग प्रणाली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून पूर्ण इमारतींना सौर उर्जा मिळणार आहे.

या प्रणालीतील नेट मीटर सिस्टमसह सौर पॅनेल आणि इन्व्हर्टर समाविष्ट असल्याने अतिरिक्त उर्जाही विकसित करून त्याचे नियोजन केले जाणार आहे. साधारणपणे २०० किलोवॅट सोलर पॅनल प्रणाली पॅनलचा उपयोग करून प्रतिवर्षी २ लाख ६० हजार युनिट वीज निर्मिती निर्माण केली जाऊ शकणार आहे. विजेच्या वाढत्या मागणी आणि किमतीमुळे सरंक्षण मिळण्याच्या दृष्टिकोनातून आणि जीवाश्म इंधनावरील आपले अवलंबित्व कमी करण्यासाठी तसेच कार्बन न्युट्रल ग्रीन कॅम्पसच्या धर्तीवर मुंबई विद्यापीठाने हे महत्वाचे पाऊल टाकले आहे.

ठाणे संकुलापाठोपाठ कलिना संकुलात प्रकल्प

ठाणे उपकेंद्र, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग, अप्लाईड सायन्सेस, कल्याण आणि कुलगुरू निवासस्थान येथे १२० किलोवॉट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाला यशस्वीरित्या सुरुवात केल्यानंतर आता कलिना संकुलात अक्षय ऊर्जेच्या वापराच्या दृष्टीने मुंबई विद्यापीठाने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अक्षय ऊर्जेचा वापर वाढवणे, कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करणे या त्रिसूत्री उद्दिष्टांनुसार विद्यापीठाने विविध उपक्रम राबवण्यास सुरुवात केली असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.

या इमारतींमध्ये बसवणार सौरऊर्जा प्रकल्प

कलिना संकुलातील सी. डी. देशमुख भवन, फिरोजशहा मेहता भवन, मौलाना अब्दुल कलाम आझाद भवन, बायो फिजीक्स विभाग इमारत, जुने व्याख्यान संकुल, लाईफ सायन्स विभाग इमारत यांचा समावेश आहे. तसेच प्रत्येक २० वॅाट क्षमतेचे ८५ सौर दिवे बसविण्यात आले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशासकीय भवन येथे २० किलोवॅाट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच ते कार्यान्वित केले जाणार आहेत.