मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरातील विद्यानगरीमध्ये श्वानांना नियमितपणे खाद्य पुरविणाऱ्या स्वयंसेवी संस्थासह श्वानप्रेमींना सुरक्षा यंत्रणेकडून बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे विद्यानगरीच्या २८० एकर परिसरात असलेल्या ८५ श्वानांवर मागील काही दिवसांपासून उपासमारीची वेळ आली आहे. या प्रकरणी तातडीने हस्तक्षेप करून श्वानांसाठी अन्न व पाण्याची व्यवस्था पूर्ववत करावी, अशी मागणी स्वयंसेवी संस्थांसह श्वानप्रेमींकडून विद्यापीठ प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

विद्यानगरीच्या विविध भागांत सुमारे ८५ श्वान वास्तव्यास आहेत. या श्वानांना अनेक श्वानप्रेमी आणि स्वयंसेवी संस्था दिवसांतून दोन वेळा अन्न देतात. बीकेसीतून चार ते पाच श्वानप्रेमी हे नियमितपणे विद्यापीठात येऊन तेथील श्वानांना अन्न देतात. विद्यापीठ परिसरातील काही श्वानप्रेमीही या कामात त्यांना मदत करतात. मात्र २५ ऑगस्टपासून सुरक्षा रक्षकांकडून त्यांना परिसरामध्ये प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे या श्वानांची प्रकृती खालावली आहे. श्वानांना दररोज अन्न उपलब्ध करून द्यावे यासाठी विद्यापीठातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नसल्याची माहिती श्वानप्रेमींनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली. सरकारी प्राधिकरणाने श्वानप्रेमी म्हणून दिलेले ओळखपत्र आमच्याकडे आहेत. विद्यापीठ प्रशासनाने आमची ओळखपत्रे तपासून आम्हाला प्रवेश द्यावा. प्रशासनाला योग्य वाटेल अशा निश्चित ठिकाणी आम्ही श्वानांना खाद्य देऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.

मुंबई विद्यापीठ प्रशासनाने श्वानांना खाद्य देणाऱ्या व्यक्तींनाच परिसरात प्रवेश नाकारला आहे. हा अमानुष प्रकार आहे. त्यामुळे हा प्रवेशबंदीचा आदेश नेमका कोणी दिला, याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या महाराष्ट्र राज्य विभागाचे सचिव नितीन ननावरे यांनी कुलगुरूंना पत्र पाठवून केली आहे. विद्यापीठाचा परिसर हा केवळ वर्गखोल्या, कार्यालये आणि प्रशासकीय कामकाजापुरता मर्यादित नसून संवेदनशीलता, सहअस्तित्व आणि सामाजिक जबाबदारी यांसारखी मूल्ये प्रतिबिंबित करणारे ठिकाण असावे, असेही त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

मुंबई विद्यापीठाचे म्हणणे

सर्वोच्च न्यायालय आणि शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशाचे मुंबई विद्यापीठाकडून पालन करण्यात येत आहे. विद्यापीठ परिसरात बाहेरून येणाऱ्या श्वानप्रेमींना त्यांना अन्न पुरविण्यापासून थांबिवण्यात आले आहे. मात्र विद्यापीठातील श्वानप्रेमींकडून त्यांना अन्न पुरविण्यावर कोणतीही बंदी घालण्यात आलेली नाही.