मुंबई : मुंबई विद्यापीठाने नुकत्याच जाहीर केलेल्या विधि तीन वर्ष अभ्यासक्रमाच्या निकालामध्ये अनेक हुशार विद्यार्थ्यांना विविध विषयांमध्ये शून्य गुण देण्यात आले आहेत. यामुळे एलएलएम परीक्षेला प्रवेश घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या विद्यार्थ्यांसमोरे मोठा पेच निर्माण झाला आहे. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडे धाव घेतल्यानंतरही त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांच्या अडचणीमध्ये अधिकच वाढ झाली आहे.

मुंबई विद्यापीठाकडून विविध अभ्यासक्रमाच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या परीक्षेचे निकाल जाहीर करण्यास विलंब होत आहे. मात्र मुंबई विद्यापीठाच्या विधि विभागातून विधि शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या तिसऱ्या वर्षाचा निकाल नुकताच जाहीर केला. या निकालामध्येही विद्यापीठाने घोळ घालण्याची परंपरा कायम ठेवली आहे. विधि तीन वर्षांच्या अंतिम परीक्षेमध्ये २९ हुशार विद्यार्थ्यांना विविध विषयांमध्ये शून्य गुण मिळाले आहेत. पुनमूल्यांकनासाठी उत्तरपत्रिका मागवली असता ती तपासली नसल्याचे उघड झाले.

त्याचप्रमाणे एका विद्यार्थ्याच्या पुनमूल्यांकनासाठी मागविलेल्या उत्तरपत्रिकेमध्ये त्याने सर्व प्रश्नांची उत्तरे लिहिली असतानाही फक्त तीनच प्रश्नांची उत्तरे तपासण्यात आल्याचे निदर्शनास आले. या विद्यार्थ्याला फक्त नऊ गुण देण्यात आले आहेत. पाच सत्रांमध्ये चांगले गुण मिळाले असताना सहाव्या म्हणजेच अखेरच्या सत्रामध्ये शून्य गुण मिळणे अशक्य असल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले. या निकालामुळे विद्यार्थ्यांना एलएलएमच्या सीईटीमध्ये चांगले गुण मिळवूनही त्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणे अशक्य झाले होते. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली होती.

या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. मात्र त्यांनी यासंदर्भात विद्यार्थ्यांना काहीच प्रतिसाद दिला नाही. अखेर हतबल झालेल्या विद्यार्थ्यांनी युवासेना सिनेट सदस्यांशी संपर्क साधला. सिनेट सदस्यांनी तातडीने प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे यांची भेट घऊन विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची तातडीने पुनर्तपासणी करण्याची मागणी केली. डॉ. भामरे यांनी या प्रकरणाची दखल घेत तातडीने पुनर्तपासणी करण्याचे आदेश दिले.

त्यानंतर परीक्षा व मूल्यमापन मंडळाने अवघ्या ४८ तासांमध्ये उत्तरपत्रिकांची पुनर्तपासणी करत या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला. या विद्यार्थ्यांचा पुन्हा निकाल जाहीर केला. या निकालामध्ये हे सर्व विद्यार्थी चांगल्य गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यापीठाने या २९ विद्यार्थ्यांचा निकाल पुन्हा लावला असला तरी अद्यापही अनेक विद्यार्थी शून्य किंवा कमी गुण मिळाले म्हणून युवासेना सिनेट सदस्यांशी संपर्क साधत आहेत. विधिचा निकाल जाहीर झाल्यानंतर पुनर्तपासणीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निकालामध्ये बदल होत आहे. या विद्यार्थ्यांना अधिक चांगले गुण मिळत आहेत. यावरून विद्यापीठाने निकालामध्ये घातलेल्या घोळाची व्याप्ती अधिक असण्याची शक्यता सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी वर्तविली आहे.

विद्यापीठाचे म्हणणे…

पुनर्तपासणीसाठी अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सुधारित निकाल तातडीने जाहीर करण्यात आला आहे. परीक्षेत शून्य गुण मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षा व मूल्यमापन मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतरही त्यावर तोडगा काढला जात नसेल, तर ही विद्यापीठाची शोकांतिका आहे. त्यामुळे या प्रकरणी कुलगुरू प्रा. डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी तातडीने संबंधितांवर कारवाई करावी. – प्रदीप सावंत, सिनेट सदस्य, युवासेना