निकालाच्या दिरंगाईने भविष्यातील संधी हातून निसटल्याची विद्यार्थ्यांची खंत

मुंबई : विधी अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर पदवी (एलएलएम) विद्यार्थ्यांच्या भविष्यातील वाटा निकालावाचून खुंटल्या आहेत. अंतिम परीक्षेचा म्हणजे सत्र चारचा निकाल अद्याप जाहीर झाला नसल्याने पुढे काय करायचे, असा प्रश्न विद्यार्थ्यांपुढे उभा आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी चालवलेला खेळ विद्यापीठाने बंद करून लवकरात लवकर निकाल जाहीर करावा, अशी मागणी ‘स्टुडंट लॉ कौन्सिल’ने केली आहे.

एलएलएमच्या चवथ्या सत्राचे प्रबंध सादरीकरण आणि मुलाखती जून २०२१ मध्ये झाले. त्यानंतर नियमानुसार ४५ दिवसात निकाल लागणे अपेक्षित होते. परंतु चार महीने उलटून गेले तरी अद्याप निकाल लागलेला नाही.

एलएलएम परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर भविष्यातील अनेक संधीचा मार्ग मोकळा होतो. अनेकांना नोकरी मिळते. जे नोकरीला आहेत त्यांची बढती होती. पीएचडी प्रवेशाची तयारी, इतर परीक्षा देण्यासाठी ते पात्र होतात. परंतु निकालच लागला नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे.

विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये एलएलएम परीक्षा पूर्ण होऊन त्याचा अहवाल विद्यापीठाकडे गेला आहे. परंतु विद्यापीठाअंतर्गत एलएलएम करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रबंधच अद्याप सादर झाले नसल्याने निकालास दिरंगाई होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. तर विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे प्रबंध सादरीकरण आठ दिवसांपूर्वी झाल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.

‘निकालाची वाट पाहून आमच्या हातच्या संधी निघून चालल्या आहेत. जून महिन्यात परीक्षा होऊनही निकाल का लागलेला नाही. जोवर निकाल लागत नाही, तोवर शिक्षण आणि नोकरीत पुढे जाणे अडचणीचे ठरते आहे,’ अशी व्यथा विद्यार्थी अरिवद कोटविन यांनी मांडली.

सर्व महाविद्यालयांच्या परीक्षा आणि प्रबंध सादरीकरण एकाच वेळी घेऊन वेळेत निकाल लावता न येणे हे विद्यापीठाचे अपयश आहे. ज्यांच्या परीक्षा लवकर झाल्या, त्यांच्यावर अन्याय झाला असून विद्यापीठाने तातडीने निकाल जाहीर करावा.

सचिन पवार, अध्यक्ष, ‘स्टुडंट लॉ कौन्सिल

एलएलएम अभ्यासक्रम चालवणाऱ्या अनेक महाविद्यालयांचे प्रबंध सादरीकरण पूर्ण झालेले नाही. त्यामुळे सर्वाचे गुण येईपर्यंत निकाल जाहीर करता येत नाही. आता जवळपास हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे दहा ते बारा दिवसात निकाल जाहीर होईल.

– विनोद पाटील, संचालक, परीक्षा विभाग, मुंबई विद्यापीठ