मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या विधि विभागातर्फे, तसेच संलग्न सर्व विधि महाविद्यालयांमधील २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील एल.एल.एम.च्या (दोन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम) प्रवेशासाठी विद्यापीठाने सीईटी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या http://www.mu.ac.in या संकेतस्थळावर ‘एल.एल.एम. सीईटी परीक्षा – २०२६-२७’ या टॅबवरून अर्ज सादर करता येणार आहे. ही परीक्षा ‘सेंटर बेस्ड ऑनलाईन’ पद्धतीने ७ जून २०२६ रोजी होणार आहे.

एल.एल.एम. अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. एलएलएम अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना ११ मे रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहेत. निर्धारित मुदतीनंतर अर्ज स्वीकारला जाणार नाही, असे मुंबई विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. तसेच अपूर्ण अर्ज बाद करण्यात येणार असल्याचेही मुंबई विद्यापीठाने जाहीर केले आहे. प्रवेश प्रक्रिया, पात्रता निकष व इतर सविस्तर माहितीसाठी मुंबई विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन मुंबई विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.

आवश्यक पात्रता निकष

एलएलएम अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी एलएलबी पदवी उत्तीर्ण झालेले, तसेच ३ किंवा ५ वर्षांच्या एलएलबी अभ्यासक्रमाच्या अंतिम सत्रात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत. ही परीक्षा ‘सेंटर बेस्ड ऑनलाईन’ पद्धतीने ७ जून २०२६ रोजी दुपारी २ ते ३ या वेळेत घेण्यात येणार असून परीक्षेचा कालावधी एक तासाचा असेल.

ऑनलाईन सीईटीसाठी परीक्षा शुल्क

सामान्य प्रवर्गासाठी सुविधा शुल्क व जीएसटीव्यतिरिक्त परीक्षा शुल्क एक हजार रुपये, तर राखीव प्रवर्गासाठी ६५० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. हे शुल्क परत मिळणार नाही. प्रवेश प्रक्रिया, पात्रता निकष व इतर सविस्तर माहितीसाठी मुंबई विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन मुंबई विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, मुंबई विद्यापीठाच्या नॅशनल सेंटर फॉर नॅनोसायन्सेस अँड नॅनोटेक्नॉलॉजी येथे शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.