मुंबई : बार काैन्सिल ऑफ इंडियामार्फत घेण्यात येणारी वकिली व्यवसायसाठी महत्त्वाची ‘अखिल भारतीय बार परीक्षा २१’ ७ जून रोजी घेण्यात येणार आहे. मात्र मुंबई विद्यापीठाने २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी एलएलएम प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा त्याच दिवशी जाहीर केली आहे. या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाने एलएलएम सीईटी परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

दोन्ही परीक्षा ७ जून रोजीच

विधिचे पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना वकिली व्यवसाय सुरू करता येतो. अनेक विद्यार्थी वकिली व्यवसायाबरोबरच पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्याला प्राधान्य देतात. जेणेकरून प्रत्यक्ष अनुभवाबरोबरच शैक्षणिक ज्ञान घेता येते. त्यासाठी हे विद्यार्थी एलएलएमला प्रवेश घेतात. मात्र मुंबई विद्यापीठाने काही दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या एलएलएम सीईटीच्या परीक्षेच्या दिवशीच बार काैन्सिल ऑफ इंडियाची ‘अखिल भारतीय बार परीक्षा-२१’ जाहीर करण्यात आली. बार कौन्सिलची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्रत्यक्ष वकिलीचा व्यवसाय करण्यासाठी परवाना मिळतो. बार कौन्सिलने ही परीक्षा ७ जून रोजी परीक्षा घेण्यात येणार असल्याचे फेब्रुवारीमध्ये जाहीर करून नोंदणी प्रक्रिया सुरू केली होती. त्यानुसार पदवीचे शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी करून तयारी सुरू केली.

विद्यार्थ्यांना मुकावे लागणार एलएलएम सीईटीला

मुंबई विद्यापीठाने काही दिवसांपूर्वी पदव्युत्तर म्हणजेच एलएलएम अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी जाहीर केलेली सीईटी ७ जून रोजीच घेण्यात येणार आहे. ‘अखिल भारतीय बार परीक्षा’ उत्तीर्ण झाल्याशिवाय प्रत्यक्ष वकिली करता नाही. त्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्गातील विधिचे पदवीचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना एलएलएमच्या सीईटीला मुकावे लागणार आहे. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाने एलएलएम सीईटी परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

मुंबई विद्यापीठ विद्यार्थ्यांबाबत वारंवार गोंधळ घालत आहे. गोंधळ घालण्याची परंपरा विद्यापीठाने कायम राखली आहे. मुंबई विद्यापीठाने एलएलएम सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून ही परीक्षा पुढे ढकलावी. जेणेकरून विद्यार्थ्यांना ‘अखिल भारतीय बार परीक्षा २१’ व एलएलएम सीईटी अशा दोन्ही परीक्षा देणे शक्य होईल. – सचिन पवार, विद्यार्थी कार्यकर्ता, भाजप