मुंबई : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या वेगाने बदलणाऱ्या युगात विद्यार्थ्यांना भविष्याभिमुख शिक्षणाची दिशा देत मुंबई विद्यापीठाच्या नॅशनल सेंटर फॉर नॅनोसायन्सेस अँड नॅनोटेक्नॉलॉजी येथे २०२६ – २७ या शैक्षणिक वर्षासाठी विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. अत्याधुनिक संशोधन सुविधा, अनुभवी मार्गदर्शक आणि प्रत्यक्ष प्रयोगाधारित शिक्षणामुळे हे केंद्र विद्यार्थ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
नवीन अभ्यासक्रम सुरू
यावर्षी पारंपरिक २ वर्षांच्या एम.एस्सी. (नॅनोसायन्स अँड नॅनोटेक्नोलॉजी) अभ्यासक्रमांसोबतच काही नवीन अभ्यासक्रमांना या केंद्रामार्फत सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी अधिक शैक्षणिक आणि संशोधनाधारित संधी उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय नॅनोविज्ञान व नॅनोतंत्रज्ञान केंद्राने यंदा बी.एस्सी. ऑनर्स (नॅनोसायन्स अँड नॅनोतंत्रज्ञान), बी.एस्सी. ऑनर्स विथ रिसर्च (नॅनोसायन्स अँड नॅनोतंत्रज्ञान), तसेच पीजी डिप्लोमा (नॅनोसायन्स अँड नॅनोतंत्रज्ञान) हे नवीन अभ्यासक्रम सुरू केले आहेत. या सर्व अभ्यासक्रमांसाठी कोणत्याही विज्ञान शाखेतील पदवीधर विद्यार्थी पात्र असतील, ज्यामुळे विविध पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्यांना नॅनोविज्ञान क्षेत्रात करिअर घडविण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय, एम.एस्सी. (नॅनोसायन्स अँड नॅनोतंत्रज्ञान) (१ वर्षाचा अभ्यासक्रम) उपलब्ध असून, त्यासाठी बी.ई./बी.टेक (संबंधित शाखा) असलेले विद्यार्थी पात्र ठरतील.
उदयोन्मुख क्षेत्रात करिअरची संधी
नॅनो स्तरावरील विज्ञानाच्या अभ्यासातून स्मार्ट मटेरियल्स, ऊर्जा साठवण तंत्रज्ञान, सेमिकंडक्टर्स, नॅनोबायोटेक्नॉलॉजी, नॅनोसेन्सर्स आणि नॅनोइलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या अत्याधुनिक क्षेत्रांत संशोधनाची संधी येथे उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक ज्ञान न देता प्रत्यक्ष प्रयोग, प्रकल्प आणि उद्योगसंलग्न प्रशिक्षणाच्या माध्यमातून सक्षम बनविण्यावर भर दिला जातो. नॅनोविज्ञान आणि नॅनोतंत्रज्ञान या उदयोन्मुख क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन या केंद्रातर्फे करण्यात आले आहे.
सविस्तर माहितीसाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी
प्रवेश प्रक्रिया, पात्रता निकष आणि इतर तपशीलांसाठी विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी, तसेच या लिंकवरून अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आल्याचे केंद्राच्या वतीने सांगण्यात आले.
