मुंबई: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (एनईपी) अंमलबजावणीनंतर करण्यात आलेले बदल, धोरणातील त्रुटी व आवश्यक सुधारणा यांचा आढावा मुंबई विद्यापीठ घेणार आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन (एनआयईपीए) या संस्थेच्या द्वारे बाह्य मूल्यमापन केले जाईल. निवडक महाविद्यालयांत सुमारे दोन महिने ही प्रक्रिया सुरू राहील.
मुंबई विद्यापीठाने २०२३ पासून एनईपीची अंमलबजावणी सुरू केली. चार वर्षांची पदवी, संशोधनासह पदवी, लघु कालावधीचे अभ्यासक्रम, मुक्त पर्यायी विषय, भारतीय ज्ञानपरंपरा, सामुदायिक सहभाग व महाविद्यालयांच्या क्लस्टर पद्धतीचा यात समावेश आहे. विद्यापीठाच्या अधिष्ठात्यांचे मंडळ सध्या महाविद्यालयांना भेटी देऊन बाह्य मूल्यमापनासाठी माहिती गोळा करीत आहे. एनईपीची अंमलबजावणी अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात असून काही त्रुटी राहण्याची शक्यता असल्याचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनीही स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम निवडीत अधिक स्वातंत्र्य देण्यासाठी विद्यापीठाने सिंगल मेजर, मेजरसह मायनर व तीन विषयांचा पर्याय अशा तीन पद्धती स्वीकारल्या आहेत. विविध विषयांतील ५१६ मुक्त पर्यायी विषयांचा संच तयार करण्यात आला आहे. मात्र, हे विषय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना संबंधित विषयाची आधीची पार्श्वभूमी नसल्यामुळे अशा विषयांसाठी अध्यापनाची पद्धतही वेगळी ठेवण्याची गरज कुलगुरूंनी व्यक्त केली.
एनईपीअंतर्गत इंटर्नशिप व प्रत्यक्ष कामाचा अनुभव वाढविण्यावरही भर आहे. त्यासाठी ‘ऑन-द-जॉब ट्रेनिंग’ची मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली आहेत. दरम्यान, ‘अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट’मध्ये नोंदणी २०२४-२५ मधील १,९२५ वरून २०२५-२६ मध्ये २,४०० झाली आहे. आता ‘एनआयईपीए’कडून होणाऱ्या मूल्यमापनातून या बदलांचा प्रत्यक्ष शैक्षणिक परिणाम किती झाला, हे स्पष्ट होणार आहे.
क्लस्टरमधून सहकार्य
एनईपीच्या अंमलबजावणीसाठी महाविद्यालयांच्या क्लस्टर पद्धतीला चालना देण्यात आली आहे. भौगोलिक संलग्नता व विषयाच्या आधारे तयार केलेल्या गटांतील महाविद्यालयांनी शिक्षक, पायाभूत सुविधा व अन्य साधनसामग्रीची देवाणघेवाण करावी, अशी अपेक्षा आहे. संयुक्त वा दुहेरी पदवी, महसूल वाटपाचे मॉडेल आणि संशोधन क्लस्टरवरही विद्यापीठ विचार करत आहे.
एनईपीअंतर्गत बदल सद्यस्थिती
चार वर्षांची ऑनर्स पदवी विद्यापीठाच्या ५० विभागांत
ऑनर्स विथ रिसर्च ४९ विभागांत
स्वायत्त महाविद्यालये ५८ ठिकाणी ऑनर्स, ३३ ठिकाणी संशोधनासह ऑनर्स
मुक्त पर्यायी विषय ५१६ विषयांचा संच
