मुंबई : अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व आदिवासी समाजातील युवक-युवतींमध्ये तंत्रज्ञानाधारित उद्योजकता विकसित करण्याच्या मुंबई विद्यापीठाच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. विद्यापीठाच्या धर्मवीर आनंद दिघे ठाणे उपकेंद्रात ‘निधी इन्क्लुझिव्ह टेक्नॉलॉजी बिझनेस इन्क्युबेटर’ स्थापनेस केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे.
समावेशक उद्योजकता आणि सामाजिक न्यायाच्या दृष्टीने हा प्रकल्प राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. सुमारे पाच कोटी रुपयांच्या प्रकल्पातून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व आदिवासी उद्योजकतेला चालना देण्यासाठी या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित होणार आहे. ठाणे तसेच परिसरातील जिल्ह्यांत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व आदिवासींमधील युवकांना तंत्रज्ञानाधारित उद्योग उभारण्यासाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.
या इन्क्युबेटरच्या माध्यमातून इन्क्युबेशन सुविधा, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, कौशल्यविकास, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, संशोधन सुविधा, उद्योग उभारणीसाठी आवश्यक प्रशिक्षण, तसेच शासनाच्या विविध निधी योजनांशी जोडण्याचे काम केले जाईल. विद्यापीठाने विकसित केलेल्या एमयु आयडियास फाऊंडेशन, सात जिल्ह्यांतील स्टार्टअप क्लिनिक्स, इन्क्युबेशन व प्री-इन्क्युबेशन उपक्रम, अविष्कार, आयडियाथॉन व उद्योग-शैक्षणिक सहकार्याचा अनुभव या केंद्रासाठी उपयोगात आणला जाईल.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठ
ठाणे व पालघर जिल्ह्यांतील वारली पेंटींग, बांबू व वनाधारित उत्पादने, हस्तकला तसेच इतर पारंपरिक उद्योगांना आधुनिक तंत्रज्ञान, नवोपक्रम व व्यावसायिक मार्गदर्शनाची जोड देऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या व्यापक उद्दिष्ट समोर ठेवून मुंबई विद्यापीठाने हे पाऊल उचलले आहे. तसेच केंद्र सरकारच्या स्टार्टअप इंडिया, इनोव्हेट इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या राष्ट्रीय उपक्रमांशी सुसंगत असलेला हा प्रकल्प सामाजिक समावेशकता, नवोपक्रम आणि शाश्वत आर्थिक विकास यांचा प्रभावी संगम ठरणार असल्याचेही कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.
तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व आदिवासी समाजातील अधिकाधिक युवक-युवतींना उद्योजकतेकडे वळविणे, त्यांना स्वावलंबी बनविणे व रोजगारनिर्मितीला चालना देणे हे या केंद्राचे प्रमुख उद्दिष्ट आहे. – प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ
