प्राध्यापकांची माहिती; ऑनलाइन नोंदणीतील गोंधळाचा फटका

मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाइन प्रवेशपूर्व नोंदणीत उडालेल्या गोंधळामुळे पदवीच्या प्रथम वर्ष प्रवेशाचे वेळापत्रक कोलमडणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांने पहिल्या सत्रात अभ्यासासाठी आवश्यक असलेले ९० दिवस पूर्ण होणे शक्य होणार नसल्याचे प्राध्यापकांचे म्हणणे आहे.

मुंबई विद्यापीठाने प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेशपूर्व नोंदणी सक्तीची केली आहे. मात्र ही प्रक्रिया सुरू झालेल्या दिवसापासून संकेतस्थळ ‘क्रॅश’ होणे, संकेतस्थळ मंदगतीने काम करणे असे प्रकार घडत होते. यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करण्यात अडचणी येत होत्या. विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन विद्यापीठाने नोंदणीच्या मुदतीत वाढ केली असून यामुळे प्रवेश प्रक्रिया ४ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. ही प्रकिया लांबल्यामुळे याचा परिणाम प्रथम वर्ष पदवीच्या वेळापत्रकावर होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. सध्या विद्यापीठामध्ये सहामाही पद्धतीने परीक्षा होत असल्यामुळे त्या कालावधीत शैक्षणिक दिवस पूर्ण करणे महाविद्यालयांना बंधकारक असते. यासाठीच्या नियमांनुसार वर्षांला १८० आणि दोन सत्रांना ९० अभ्यासाचे दिवस पूर्ण होणे आवश्यक आहे. सध्याच्या वेळापत्रकानुसार महाविद्यालयांना प्रथम वर्षांसाठी आवश्यक असलेले पहिल्या सत्राचे ९० दिवस पूर्ण करणे अवघड असल्याचे ‘नॉन गव्हर्न्मेंट प्रिन्सिपल असोसिएशन’चे अध्यक्ष डॉ. टी. ए. शिवारे यांनी स्पष्ट केले. या वर्षी बारावीचा निकाल लवकर लागला तरीही विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे प्रथम वर्षांचे वर्ग सुरू होण्यास उशीर होणार असल्याचेही ते म्हणाले. विद्यापीठाने ही प्रक्रिया मार्च महिन्यात पूर्ण करून निकाल लागल्यावर लगेचच संकेतस्थळ सुरू केले असते तर ही प्रक्रिया वेळेत संपून महाविद्यालये वेळेत सुरू झाली असती.