मुंबई : ललित कला, साहित्य कला, संगीत, नाट्य, आणि नृत्य कलेतील विविध स्पर्धांनी सजलेल्या मुंबई विद्यापीठाच्या ५६ व्या सांस्कृतिक युवा महोत्सवातील विजेत्यांचा व आयोजन समितीतील सदस्यांचा सत्कार सोहळा फोर्ट संकुलातील सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात नुकताच आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी युवा महोत्सवाच्या राज्यस्तरीय, पश्चिम विभागीय आणि राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये विजेतेपद प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांनाही पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम, मुंबई विद्यापीठाचे प्र – कुलगुरू डॉ. अजय भामरे, प्रभारी कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.

माटुंग्यातील पोदार महाविद्यालयाने ५६ व्या युवा महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. तर मिठीबाई महाविद्यालयाने द्वितीय क्रमांक आणि जोशी बेडेकर महाविद्यालयाने तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकावर विजयी मोहोर उमटवली. तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातील विश्वनाश मांलडकर याला जॅकपॉट स्पर्धेतील विजेता म्हणून ‘मिस्टर युनिव्हर्सिटी’, तर पोदार महाविद्यालयातील रिया मोरे हिला ‘मिस युनिव्हर्सिटी’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच अमेय करूलकर हा ‘गोल्डन बॉय’ आणि आशना जैन ही ‘गोल्डन गर्ल’ पुरस्काराची मानकरी ठरली. यंदाच्या युवा महोत्सवातील प्राथमिक फेऱ्या १ ते २३ ऑगस्ट २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये एकूण ३५७ महाविद्यालयांतील ९ हजार १३३ विद्यार्थी सहभागी झाले होते. तर प्राथमिक फेरीतील विजेत्यांची अंतिम फेरी ही ८ ऑक्टोबरपर्यंत पार पडली.

हेही वाचा : Milind Deora : मिलिंद देवरांचा आदित्य ठाकरेंना सल्ला, “फक्त प्रेमपत्र लिहू नका…”

‘युवा महोत्सवासारख्या स्तुत्य उपक्रमातून अनेक प्रतिभावंताना त्यांच्यातील सुप्त कलागुणांचा अविष्कार सादर करण्याची मोठी संधी मिळते’, असे मत शिवाजी साटम यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनिल पाटील, सूत्रसंचालन डॉ. नीतिन आरेकर आणि आभार प्रदर्शन सांस्कृतिक समन्वयक निलेश सावे यांनी केले.

‘एनएमआयएमएस’तर्फे एमबीए अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू

श्री विलेपार्ले केळवणी मंडळाच्या नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ बिजनेस मॅनेजमेंट म्हणजेच ‘एनएमआयएमएस’च्या स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंटच्या (एसबीएम) शैक्षणिक वर्ष २०२४-२५ अंतर्गत असणाऱ्या एमबीए अभ्यासक्रमांसाठीची नावनोंदणी प्रक्रिया सुरू झालेली आहे. मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, नवी मुंबई आणि इंदूर येथील स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट येथे ‘एनएमएटी’च्या माध्यमातून एमबीए अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून विद्यार्थ्यांना https://nmat.nmims.edu या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरता येईल. याच संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसंबंधित सविस्तर माहिती मिळेल. तसेच विद्यार्थ्यांना आवश्यक व्यावसायिक कौशल्यांसह शाश्वत आणि नैतिक पद्धतींबद्दल जबाबदारीची भावना निर्माण करण्यासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरेल.

हेही वाचा : मुंबई: गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या एसटी भरल्या

‘एनएमआयएमएसमधील एमबीए अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना त्यांच्या कारकिर्दीत उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी आणि व्यावसायिक जगतात अर्थपूर्ण योगदानाठी आवश्यक तांत्रिक आणि व्यवस्थापकीय कौशल्ये प्रदान करण्यासाठी तयार केले आहेत’, असे एनएमआयएमएसचे कुलगुरू डॉ. रमेश भट म्हणाले. या शैक्षणिक संस्थेत एमबीए हा अभ्यासक्रम मनुष्यबळ, फार्मास्युटिकल मॅनेजमेंट, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, बिझनेस ॲनालिटिक्स यांसह विविध व्यावसायिक आवडी – निवडी पूर्ण करणाऱ्या प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.

विल्सन महाविद्यालयाचा ‘पोलारिस’ माध्यम महोत्सव उत्साहात

गिरगाव चौपाटीसमोर असणाऱ्या विल्सन महाविद्यालयातील बीएएमएमसी विभागातर्फे नुकतेच दोन दिवसीय ‘पोलारिस’ या आंतरमहाविद्यालयीन माध्यम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरण संवर्धन व संरक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी यंदाच्या महोत्सवाची मध्यवर्ती संकल्पन ‘द एनचांटेड फॉरेस्ट’ ही होती. सभोवताली असणारा कचरा कमी करण्याचा संदेश देत विल्सन महाविद्यालयातील टाकाऊ वस्तूंचा वापर करून महोत्सवासाठी महाविद्यालयात सजावट करण्यात आली होती. या महोत्सवात विविध महाविद्यालयातील एक हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. पर्यावरणस्नेही महोत्सव अशी ओळख असलेल्या ‘पोलारिस’ महोत्सवाचे यंदा २३ वे वर्ष होते.

हेही वाचा : मोफा कायद्याचे भवितव्य पुन्हा महाधिवक्त्यांवर अवलंबून! सुधारणा करण्याचा प्रयत्न तूर्त अयशस्वी

‘पोलारिस’ महोत्सवाच्या दोन दिवसांत प्रसारमाध्यम क्षेत्राशी निगडित प्रतिकात्मक स्वरूपात वार्तांकन, पत्रकार परिषद, लघुपट निर्मिती, विविध संकल्पनांवर आधारित छायाचित्र व छायाचित्रण करणे आदी विविध स्पर्धा रंगल्या. तसेच विविधांगी उपक्रमांना स्पर्धकांसह शिक्षकांचाही उदंड प्रतिसाद मिळाला. तर ‘पीआर परेड’ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तसेच महोत्सवस्थळी पर्यावरणपूरक वस्तू आणि विविध पदार्थ घेण्यासाठी स्पर्धकांनी गर्दीही केली होती.