Snehalata Deshmukh : मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरु स्नेहलता देशमुख यांचं निधन झालं आहे. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरु म्हणून त्यांची कारकीर्द चर्चेत राहिली होती. शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या, शिक्षण पद्धतीतले नवे बदल स्वीकारणाऱ्या कुलगुरु म्हणून त्या प्रसिद्ध होत्या. तसंच त्यांना अनेक मानसन्मानही मिळाले होते. याच स्नेहलता देशमुख यांचं आज सकाळी निधन झालं. कुलगुरु या पदावर असताना अनेक धडाडीचे आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेत सक्षम युवा पिढीच्या निर्मितीसाठी त्यांनी पुढाकार घेतला. प्रख्यात बालरोग शल्यचिकित्सक म्हणून त्यांनी केलेले कार्य आणि ‘दुग्धपेढी’ ही त्यांची संकल्पना वैद्यकीय क्षेत्रात नेहमीच स्मरणात राहिल यात शंका नाही.
धडाडीच्या निर्णयांसाठी स्नेहलता देशमुख प्रसिद्ध
स्नेहलता देशमुख ( Snehalata Deshmukh ) यांनी गर्भसंस्कार, नवजात शिशू आणि माता यांचा आहार या विषयांमध्ये महत्त्वाचं कार्य केलं. स्नेहलता देशमुख या शिव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या अधिष्ठाताही होत्या. १९९५ मध्ये त्या मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरु म्हणून नियुक्त झाल्या. पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी धडाडीचे निर्णय घेतले. विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीच्या प्रमाणपत्रावर वडिलांप्रमाणेच आईचंही नाव असलं पाहिजे हा निर्णय त्यांनीच घेतला होता.
स्नेहलता देशमुख यांना पुरस्कार देऊनही गौरवण्यात आलं होतं
Snehalata Deshmukh यांनी गर्भसंस्कार तंत्र आणि मंत्र, तंत्रयुगातील उमलती मने, अरे संस्कार संस्कार ही पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. त्यांच्या सामाजिक कार्यासाठी त्यांना डॉ. बी.सी. रॉय पुरस्कार, धन्वंतरी पुरस्कार या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. मुंबईतील पार्ले टिळक विद्यालय संस्थेच्या संचाल मंडळात त्या विश्वस्थ म्हणूनही कार्यरत होत्या. वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.
डॉ. स्नेहलता देशमुख यांचा अल्प परिचय
डॉ. स्नेहलता देशमुख ( Snehalata Deshmukh ) या लहान असल्यापासूनच प्रचंड मेहनती आणि जिद्द बाळगणाऱ्या होत्या. रांगोळी, एम्ब्रॉयडरी, ड्रॉईंग-पेन्टिंग, गाणी ह्या सर्व कलांमध्ये त्या पारंगत होत्या. गाण्याची आवडही आईकडून त्यांच्याकडे आली आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन मला वडिलांनी दिला असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. त्यांचे वडील दिलरुबा वाजवत असे. स्नेहलताबाईंचे वडील म्हणजे डॉ. श्रीकृष्ण वासुदेव जोगळेकर हे शस्त्रक्रियेची (सर्जरीची) पदवी प्राप्त केलेले उत्तम डॉक्टर होते. मुंबईतील शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालय व के.ई.एम. रुग्णालय येथे अधिष्ठाता म्हणून यशस्वी कारकीर्द घडवणारे डॉक्टर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत स्नेहलता देशमुखही डॉक्टर झाल्या. यशाची अनेक शिखरं त्यांनी गाठली होती.
हे पण वाचा- पुरोगामी महाराष्ट्रात महिला कुलगुरूंची संख्या नगण्यच
डॉ. स्नेहलता देशमुख ( Snehalata Deshmukh ) यांचं शालेय शिक्षण इंटरपर्यंत झालं होतं तर महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी दादर येथील इंडियन एज्युकेशन सोसायटीची मुलींची शाळा आणि रुईया महाविद्यालयातून घेतलं. त्यानंतर त्यांनी जी.एस. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. एम.बी.बी.एस.ला त्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये सर्वप्रथम आल्या व पुढच्या शस्त्रक्रियेच्या शिक्षणासाठी हक्काने टाटा रुग्णालयामध्ये गेल्या. पण त्यांना प्रवेश नाकारण्यात आला; कारण त्या वेळी कर्करोगावरच्या शस्त्रक्रियेसाठी मुलींना प्रवेश देण्यात येत नसे. स्नेहलता देशमुख यांनी प्रवेश मिळावा म्हणून बराच संघर्ष केला; पण त्यांना यश आलं नाही. अखेरीस त्यांनी जी.एस.मध्ये अर्भकांवरची शस्त्रक्रिया या विषयात त्यांनी पुढील शिक्षण घेतलं. शिक्षण पूर्ण झाल्यावर एक विख्यात शल्यविशारद म्हणून त्यांनी ख्याती मिळवली.