‘दूर व मुक्त अध्ययन संस्थे’ची नावे, सामाजिक दाखले यांची चुकीच्या पद्धतीने मांडणी

भोंगळ कारभारासाठी नेहमीच चर्चेत असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या क्रमिक अभ्यासातील समाजशास्त्रच्या पुस्तकांमध्ये गंभीर चुका असल्याचे उघडकीस आले आहे. नावे, सामाजिक दाखले अत्यंत चुकीच्या पद्धतीने पुस्तकांमध्ये मांडल्यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत चुकीच्या गोष्टी पोहोचविल्या जात आहेत. पुस्तकांतील मजकुराची कोणतीही तपासणी न करता विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविल्याचे यातून समोर आले आहे.

पूर्णवेळ शिक्षण घेणे शक्य नसलेले हजारो विद्यार्थी विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या माध्यमातून शिक्षण पूर्ण करत आहेत. अभ्यासक्रमावर आधारित पुस्तके संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना पुरविली जातात. या पुस्तकांच्या दर्जाबाबत नेहमीच शंका उपस्थित केली जाते. या वेळेस संस्थेच्या समाजशास्त्र विषयाच्या पुस्तकामध्ये गंभीर चुका आढळून आल्या आहेत. यात अर्जुनाने ‘उलुपी’ या नागकन्येशी व भीमसेनाने ‘हिडिंबा’ या राक्षस स्त्रीशी विवाह केल्यामुळे स्त्रियांच्या शिक्षणाला हळूहळू उतरती कळा लागली, (लिंग आणि समाज, समाजशास्त्र भाग-२, पान नं. ४२) असा उल्लेख करण्यात आला आहे. स्त्रियांच्या अधोगतीला अर्जुन, भीम आणि हिडिंबा यांना हे पुस्तक लिहिणाऱ्याने जबाबदार ठरविले आहे, असे यातून स्पष्ट होत आहे. इतकेच नव्हे तर भारतात जातिव्यवस्था ही ब्रिटिश राज्यापासून चालू झाली व निरनिराळ्या जातींचे लोक हे मोठय़ा गटांनी नवीन व्यावसायिक शोधाच्या निमित्ताने शहराकडे स्थलांतरित झाले, (उद्योगधंदे, कामगार वर्ग आणि समाज, समाजशास्त्र भाग-२, पान नं. ३०) असा उल्लेख एके ठिकाणी करण्यात आला आहे. भारतात जातिव्यवस्था ही ब्रिटिशांच्या आधीपासूनच अस्तित्वात असताना असे चुकीचे दाखले देऊन विद्यापीठातील विद्यार्थ्यांची दिशाभूल केली जात आहे.

याशिवाय भारतातील आदिवासी जमातींनी संस्कृत भाषेची चळवळ निर्माण केली, (सामाजिक चळवळीचे समाजशास्त्र, समाजशास्त्र भाग-२, पान नं. १२०) असे लिहिलेले आहे. कोणताही संदर्भ न देता हे मांडले असून यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत चुकीची माहिती पोहोचत असल्याचा आरोप विद्यार्थी संघटनेने केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिक येथे कालीमाता मंदिरात सत्याग्रह केल्याचा उल्लेख सदर पुस्तकात करण्यात आला आहे, (लिंग आणि समाज, समाजशास्त्र भाग-२, पान नं. ३८) या वाक्यातील मंदिर कालीमातेचे नसून काळाराम असे आहे.

विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांच्या पुस्तकामध्ये अनेक चुका असून त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे पुस्तकाच्या लेखकावर कारवाई करण्यात यावी. तसेच मूळ लेखक आणि भाषांतरकार यांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी छात्रभारती संघटनेने केली आहे.