मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागातील ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य, अध्यापनविषयक ग्रंथ, संस्थात्मक नोंदी आणि विभागाच्या स्थापनेशी संबंधित दस्तऐवजांचे सर्वेक्षण, सूचीकरण व डिजिटायझेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या विभागातील १०७ वर्षांचा इतिहास डिजिटल स्वरुपात जगभरातील संशोधकांसाठी खुला होणार आहे. ब्रिटिश लायब्ररीच्या ‘एंडेंजर्ड आर्काइव्ह्ज प्रोग्राम’ (ईएपी) अंतर्गत, आर्केडियाच्या सहकार्याने मुंबई विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. मनीषा राव यांच्या पायलट प्रकल्पाची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय समाजशास्त्राच्या जडणघडणीचा महत्त्वाचा दस्तऐवजी इतिहास जतन होण्यासह जागतिक संशोधनासाठी उपलब्ध होणार आहे.
‘सर्व्हे अँड डिजिटायझेशन ऑफ द लेगसी ऑफ द डिसिप्लिन ऑफ सोशिऑलॉजी इन इंडिया : रेकॉर्ड्स ऑफ द युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई’ या प्रकल्पांतर्गत जुलै २०२६ पासून १२ महिन्यांच्या कालावधीत हे डिजिटायझेशन करण्यात येणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाचा इतिहास भारतीय समाजशास्त्राच्या वाटचालीशी जोडलेला आहे. १९१९ मध्ये स्थापन झालेला १०० वर्षांहून अधिक जुना हा भारतातील पहिला पदव्युत्तर समाजशास्त्र अध्यापन विभाग आहे. प्रसिद्ध स्कॉटिश नगररचनाकार, समाजशास्त्रज्ञ आणि विचारवंत सर पॅट्रिक गेड्डेस हे या विभागाचे पहिले विद्यापीठीय प्राध्यापक व विभागप्रमुख होते.
या प्रकल्पामुळे समाजशास्त्राच्या भारतातील उद्यापासून त्याच्या संस्थात्मक विकासापर्यंतचा प्रवास समजून घेण्यासाठी संशोधकांना महत्त्वपूर्ण प्राथमिक स्रोत उपलब्ध होणार आहेत. समाजशास्त्रीय विचार, अध्यापनपद्धती, शैक्षणिक परंपरा आणि संस्थात्मक कार्यपद्धती कालानुरूप कशा विकसित झाल्या, याचा अभ्यास करण्यासाठी या नोंदी उपयुक्त ठरणार आहेत.
डिजिटायझेशननंतर हा ऐतिहासिक दस्तऐवजी वारसा केवळ मुंबई विद्यापीठापुरता मर्यादित न राहता स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधकांसाठी जागतिक स्तरावर उपलब्ध होणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या समृद्ध शैक्षणिक परंपरेचे जतन करण्याबरोबरच भारतातील समाजशास्त्राच्या इतिहासाला जागतिक संशोधनाच्या नकाशावर स्थान मिळवून देणारा हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
