मुंबई : मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या उन्हाळी सत्रातील विविध अभ्यासक्रमांचे निकाल नुकतेच जाहीर केले आहेत, तर काही अभ्यासक्रमांच्या निकालाची विद्यार्थ्यांना अद्यापही प्रतीक्षा आहे. जाहीर झालेल्या निकालामध्येही असंख्य त्रुटी आढळल्या असून विद्यार्थ्यांना मनस्ताप होत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकन आणि छायांकित प्रतीसाठीचे अर्ज व यासाठीचे विहित शुल्क ऑनलाइन पद्धतीने विद्यापीठाच्या www.mu.ac.in या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त करता येणार असल्याचे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने स्पष्ट केले आहे. हेही वाचा >>> Apple WWDC 2023 Live: iOS 17 अपडेटमध्ये मिळणार कॉन्टॅक्ट पोस्टर फिचर, महत्वाच्या अपडेट्स एकाच क्लिकवर विद्यार्थ्यांनी www.mu.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर गेल्यानंतर 'एक्झामिनेशन' या पर्यायावर क्लिक करावे. यानंतर पुनर्मूल्यांकन आणि छायांकित प्रतीसाठी अर्ज प्राप्त होईल. अर्ज शुल्क भरल्यानंतर 'सेंड एनीवे' या पर्यायावर क्लिक करावे आणि मग पोचपावती प्राप्त झाल्याशिवाय अर्ज भरल्याची खातरजमा होणार नाही. सदर अर्ज भरताना कोणत्याही अडचणी आल्यास संकेतस्थळावरील संबंधित परीक्षेच्या लिंक बंद होण्यापूर्वी कलिना संकुलातील परीक्षा भवनातील पुनर्मूल्यांकन व छायांकित प्रत कक्षात सकाळी ११ ते दुपारी ३ या या वेळेत संपर्क साधण्याचे आवाहन विद्यापीठाने केले आहे. तर संबंधित परीक्षेच्या पुनर्मूल्यांकन आणि छायांकित प्रत अर्जाची लिंक ही निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील सात दिवसांच्या आत सुरु करण्यात येणार असून, मग पुढील १२ दिवसांपर्यंत विद्यार्थ्यांना सदर प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असेल. अर्ज स्वीकारण्याची मुदत संपल्यानंतर अर्ज स्विकारले जाणार नसल्याचे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. खुल्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन व ऑफलाइन स्वरूपातील अर्ज शुल्क १० रुपये, पुनर्मूल्यांकन शुल्क २५० रुपये, छायांकित प्रत शुल्क ५० रुपये आणि राखीव प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज शुल्क १० रुपये, पुनर्मूल्यांकन शुल्क १५० रुपये, छायांकित प्रत शुल्क २५ रुपये आकारण्यात येणार आहे.