मुंबई : जागतिक स्तरावर कला आणि संस्कृतीचा अनुभव घेण्याची दुर्मिळ संधी मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनाठी उपलब्ध होणार आहे. रशियातील मॉस्को येथील ‘इन्नोप्रक्टिका स्कूल’शी मुंबई विद्यापीठाने केलेल्या सामंजस्य कराराच्या पार्श्वभूमीवर फाइन आर्ट्स व नृत्य क्षेत्रातील प्रतिभावान विद्यार्थ्यांना फाइन आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी रशिया येथे पाठविण्यात येणार आहे.

रशियाच्या सेंट पीटर्सबर्गमधील बोरिस आयफमन डान्स अकॅडमी येथे २९ जून ते १९ जुलै २०२६ या कालावधीत ‘फाइन आर्ट्स अँड कोरिओग्राफी सेशन’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण सत्रात विद्यार्थ्यांना व्याख्याने, कार्यशाळा, चर्चासत्रे, सर्जनशील उपक्रम आणि शैक्षणिक सहलींच्या माध्यमातून व्यापक अनुभव मिळणार आहे.

तीन टप्प्यात होणार कार्यक्रम

कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात रशियन संस्कृतीचा इतिहास, प्रादेशिक वैशिष्ट्ये, नामवंत कलावंत आणि त्यांच्या सर्जनशील योगदानाची माहिती देण्यात येईल. संवादात्मक सत्रांमधून विद्यार्थ्यांना जागतिक सांस्कृतिक विविधता आणि आधुनिक जगातील गुंतागुंतीच्या पैलूंवर विचारमंथन करण्याची संधी मिळेल. दुसऱ्या टप्प्यात विविध अकॅडमींमध्ये प्रत्यक्ष कार्यशाळांद्वारे विद्यार्थ्यांना स्वतःचे सर्जनशील प्रकल्प तयार करण्याची संधी मिळणार असून शेवटी त्यांचे सादरीकरणही करण्यात येणार आहे. याशिवाय सेंट पीटर्सबर्गमधील प्रसिद्ध संग्रहालये, नाट्यगृहे आणि ऐतिहासिक स्थळांना भेट देता येणार आहे. हा कार्यक्रम पूर्णतः अर्थसहाय्यित असून विद्यार्थ्यांचा प्रवास, व्हिसा, निवास, भोजन आणि प्रशिक्षणाचा सर्व खर्च आयोजक ‘इन्नोप्रक्टिका स्कूल’, रशिया यांच्याकडून करण्यात येणार आहे.

सहभागासाठी आवश्यक पात्रात निकष

या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना अटींची पूर्तता करावी लागणार आहे. फाइन आर्ट्स प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे वय १८ ते ३५ वर्षे आणि नृत्य प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे वय २१ ते ३५ वर्षे असणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचे चांगले ज्ञान असावे व विद्यार्थ्याकडे वैध पासपोर्ट असावा.

अर्जाच्या छाननीअंती निवड

विद्यार्थ्यांकडून अर्ज व आवश्यक कागदपत्रे स्वीकारल्यानंतर त्यांची छाननी विद्यार्थी विकास विभागामार्फत करण्यात येणार आहे. त्यानंतर कुलगुरू नामनिर्देशित समिती विद्यार्थ्यांची यादी अंतिम शिफारसीसाठी विद्यार्थी विकास विभागामार्फत ‘इन्नोप्रक्टिका स्कूल’कडे पाठणार आहे. विद्यार्थ्यांची अंतिम निवड ही आयोजक संस्था ‘इन्नोप्रक्टिका स्कूल’मार्फत करण्यात येणार आहे.

अर्ज वेळेत सादर करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन

मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवर आपली कला सादर करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय अनुभव मिळवण्यासाठी ही सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली असून इच्छुक विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज सादर करावेत, या अनुषंगाचे परिपत्रक विद्यापीठातर्फे आधीच जारी केले आहे.