मुंबई : मुंबई विद्यापीठ हे स्वतंत्र आहे. त्यांना थेट आदेश देता येणार नाहीत पण शासनाच्या वतीने टीवायबीकॉम पेपर फुटीची सीआयडी चौकशी करण्यात यावी अशा सूचना दिल्या जातील, असे आश्वासन उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिले.

मुंबई विद्यापीठाच्या टीवायबीकॉम (तृतीय वर्ष वाणिज्य) परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटीच्या गंभीर प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्याची सूचना विद्यापीठाच्या कुलगुरूंना केली जाईल, असे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत केली. प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणामागे संघटित रॅकेट आणि परीक्षा व्यवस्थापनाशी संबंधित व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विधान परिषदेत या विषयावर चर्चा करताना सदस्यांनी मुंबई विद्यापीठाच्या एप्रिल २०२६ मध्ये झालेल्या टीवायबीकॉम सत्र क्रमांक ६ परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटीचा मुद्दा उपस्थित केला. इकॉनॉमिक्स ऑफ कॉमर्स तसेच डायरेक्ट अँड इनडायरेक्ट टॅक्सेस या दोन विषयांच्या प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्यापूर्वीच सोशल मीडियावर उपलब्ध झाल्याचा आरोप करण्यात आला.

एप्रिल २०२६ च्या तिसऱ्या आठवड्यात हा प्रकार उघडकीस आला. बांद्रा येथील आर डी नॅशनल कॉलेज येथे विद्यापीठाच्या भरारी पथकाने तपासणी केली असता सहा विद्यार्थी मोबाईल फोनसह आढळून आले. त्यांच्या चौकशीनंतर प्रश्नपत्रिका फुटीचे धागेदोरे समोर आले. तपासात पश्चिम उपनगरातील काही खासगी क्लासेसच्या व्हॉट्सॲप गटांवर संबंधित प्रश्नपत्रिका आणि त्यांची उत्तरे परीक्षा सुरू होण्यापूर्वीच प्रसारित करण्यात आल्याचे समोर आले.

या प्रकरणात विद्यापीठ प्रशासनाने संबंधित विद्यार्थ्यांचे मोबाईल फोन जप्त केले असले तरी घटनेच्या गांभीर्याच्या तुलनेत पोलिसांकडे तातडीने गुन्हा दाखल न झाल्याबद्दल सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. प्रश्नपत्रिका फुटीमागे केवळ विद्यार्थी नसून संघटित रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. तसेच परीक्षा व्यवस्थापनाशी संबंधित काही व्यक्तींचाही सहभाग असू शकतो, असा संशय व्यक्त करण्यात आला. यावर उत्तर देताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा अत्यंत गंभीर प्रकार असल्याचे मान्य केले. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित अशा घटनांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी सीआयडी चौकशीची सूचना विद्यापीठाच्या कुलगुरूंना करण्यात येईल, असे त्यांनी सभागृहात स्पष्ट केले. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी परीक्षा सुरक्षाव्यवस्थेचे पुनर्मूल्यांकन करण्यात येणार असून डिजिटल प्रणालीतील त्रुटी शोधून त्यावर उपाययोजना केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.

मुंबई विद्यापीठातील या कथित पेपरफुटी प्रकरणामुळे परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून सीआयडी चौकशीच्या घोषणेमुळे या प्रकरणातील खरे सूत्रधार समोर येणार का, याकडे विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे. काँग्रेसचे भाई जगताप यांनी ही लक्षवेधी उपस्थित केली होती.