मुंबई : मुंबई विद्यापीठाने २०२६-२७ या शैक्षणिक वर्षामधील प्रथम वर्ष पदवी प्रवेश प्रक्रियेसाठी चौथ्या आणि पाचव्या फेरीचे वेळापत्रक जाहीर केले. प्रवेशाच्या चौथ्या व पाचव्या फेरीसाठी विद्यार्थ्यांना ५ ते ११ जूनदरम्यान नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर चौथी गुणवत्ता यादी १२ जून रोजी, तर पाचवी गुणवत्ता यादी १६ जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

मुंबई विद्यापीठाने पदवी अभ्यासक्रमाच्या तीन फेऱ्या जाहीर केल्यानंतर आता चौथ्या व पाचव्या फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. विद्यापीठाच्या ई-समर्थ पोर्टलद्वारे प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून विद्यार्थ्यांना या फेरीतील प्रवेशासाठी ५ ते ११ जूनदरम्यान दुपारी १ पर्यंत प्रवेशपूर्व नोंदणी करायची आहे. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाऊन आवश्यक माहिती भरून नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर चौथी गुणवत्ता यादी १२ जून रोजी सकाळी ११ वाजता जाहीर केली जाणार आहे. या यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना १२ ते १५ जूनदरम्यान दुपारी ४ पर्यंत कागदपत्रांची ऑनलाईन पडताळणी करून प्रवेश शुल्क भरून प्रवेश निश्चित करायचा आहे. त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांसाठी पाचवी गुणवत्ता यादी १६ जून रोजी सकाळी १० वाजता जाहीर करण्यात येणार आहे. या यादीतील विद्यार्थ्यांना १६ ते १७ जूनदरम्यान सायंकाळी ५ पर्यंत कागदपत्र पडताळणी व शुल्क भरून प्रवेश निश्चित करायची आहे.

प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या ई-समर्थ पोर्टलवर नोंदणी करण्याबरोबरच महाविद्यालयांच्या पोर्टलवर किंवा महाविद्यालयांमध्ये ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करणे आवश्यक असल्याचे मुंबई विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले. प्रवेश क्षमता, आरक्षण नियम आणि विद्यापीठाच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच प्रवेश निश्चित केले जाणार आहेत. दरम्यान, तिसऱ्या गुणवत्ता यादीपर्यंत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी चौथी व पाचवी गुणवत्ता यादी ही महत्त्वाची संधी ठरणार असून, विद्यार्थ्यांनी वेळेत नोंदणी, कागदपत्र पडताळणी आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई विद्यापीठाने केले आहे.

प्रवेशाचे वेळापत्रक

  • प्रवेशपूर्व नोंदणी : ५ ते ११ जून – चौथी गुणवत्ता यादी : १२ जून (सकाळी ११ वाजता) – पडताळणी व शुल्क भरणा : १२ ते १५ जून – पाचवी गुणवत्ता यादी : १६ जून (सकाळी १० वाजता) – पडताळणी व शुल्क भरणा : १६ ते १७ जून