मुंबई : मुंबई विद्यापीठाला १५० वर्ष पूर्ण झाली, त्यानिमित्त प्रशासनाने तत्कालिन कुलगुरूंसाठी १८५७ हा विशेष क्रमांक असलेली गाडी खरेदी केली होती. मात्र काही वर्षांपासून ही गाडी फाेर्ट संकुलामध्ये धूळ खात उभी आहे. त्यामुळे विद्यापीठातील उपहारगृहाचा मालक या गाडीचा वापर साहित्य साठवून ठेवण्यासाठी करीत असल्याची बाब शनिवारी अधिसभेपूर्वी युवा सेनेच्या सिनेट सदस्यांनी कुलसचिवांच्या निदर्शनास आणून त्यांना धारेवर धरले. तसेच विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न कुलगुरूंच्या निदर्शनास आणूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने सिनेट सदस्यांनी अधिसभेपूर्वी विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराबाहेर जोरदार आंदोलन केले.

मुंबई विद्यापीठ तत्कालिन कुलगुरू व प्र कुलगुरू यांच्यासाठी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कातून दोन गाड्या खरेदी करण्यात आल्या होत्या. मुंबई विद्यापीठाला १५० वर्ष झाल्याच्या निमित्ताने या गाड्या खरेदी करण्यात आल्या होत्या. कुलगुरूंसाठी ‘एमएच ०१ बीके १८५७’ या विशेष क्रमांकाची गाडी खरेदी करण्यात आली होती. मात्र त्यानंतरच्या कुलगुरूंनी नवीन गाडी खरेदी केली.

नव्या कुलगुरूंसाठी नवी गाडी खरेदी केल्यानंतर विशेष क्रमांक असलेल्या गाडीचा लिलाव न केल्याने त्या दोन्ही गाड्या वापराविनाच उभ्या होत्या. १८५७ या क्रमांकाची विशेष गाडी प्रशासनाच्या अनास्थेमुळे फोर्ट संकुलाच्या परिसरामध्ये धुळखात पडली आहे. त्यावर कळस म्हणजे फोर्ट संकुलातील उपहारगृहाच्या मालकाकडून या गाडीचा वापर साहित्य ठेवण्यासाठी केला जात असल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला.

ही बाब युवा सेना अधिसभा सदस्यांना कळताच त्यांनी ती कुलसचिवांच्या लक्षात आणून दिली आणि त्यांना धारेवर धरले. मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू आणि प्र कुलगुरूंसाठी या दोन्ही गाड्या विद्यार्थ्यांच्या पैशातून खरेदी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही गाड्यांचा लिलाव करा आणि त्याचे पैसे मुंबई विद्यापीठाच्या खात्यात जमा करा, अशी मागणी युवा सेनेच्या सिनेट सदस्यांनी केली.

अधिसभेपूर्वी फलकबाजी

मुंबई विद्यापीठ अर्थसंकल्पीय अधिसभा (सिनेट) अधिवेशन शनिवार, १४ मार्च,२०२६ रोजी पार पडली. मागील अनेक वर्षांपासून युवा सेनेने विद्यार्थांच्या हिताच्या दृष्टीने केलेल्या मागण्यांकडे विद्यापीठ प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. या मागण्या अद्यापपर्यंत पूर्ण न झाल्याने युवा सेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, मिलिंद साटम, शशिकांत झोरे, डॉ. धनराज कोहचडे, परमात्मा यादव, मयुर पांचाळ, किसन सावंत आणि स्नेहा गवळी यांनी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर फलक हातात घेऊन जोरदार आंदोलन करत निषेध केला.