मुंबई : पीएचडी संशोधनातून निर्माण होणाऱ्या नाविन्यपूर्ण कल्पनांना केवळ शोधनिबंध आणि प्रकाशनापुरते मर्यादित न ठेवता त्यांचे समाजोपयोगी व व्यावसायिक रूपांतर करून स्टार्टअपच्या माध्यमातून पुढे न्यावे, असे आवाहन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी केले. मुंबई विद्यापीठात पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांची विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. या सभेला ३५० हून अधिक संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.

संशोधन वृत्तीला चालना आणि संशोधनाला व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या ‘अविष्कार’ संशोधन महोत्सवात पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांचा व्यापक सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. ‘अविष्कार’ हा केवळ विज्ञान व तंत्रज्ञानापुरता मर्यादित नसून मानव्यविद्या, भाषा आणि कला; वाणिज्य व्यवस्थापन व विधि; मुलभूत शास्त्रे; शेती व पशू संवर्धन; अभियांत्रिकी व तंत्रज्ञान आणि वैद्यक शास्त्र व औषधशास्त्र अशा सहा क्षेत्रांतील नाविन्यपूर्ण संशोधनाला संधी देत असल्याचे त्यांनी सांगितले. संशोधक विद्यार्थ्यांनी आपल्या संशोधनातील नाविन्यपूर्ण कल्पना स्पर्धेच्या माध्यमातून प्रभावीपणे सादर कराव्यात, असेही आवाहनप्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी केले. मुंबई विद्यापीठाने गेल्या सात वर्षांत ‘अविष्कार’ संशोधन स्पर्धेत सातत्यपूर्ण यश मिळवत राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट विद्यापीठाचा बहुमान संपादन केला आहे. संशोधकांच्या सक्रिय सहभागातून ही यशस्वी परंपरा कायम ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले.

प्रकल्प निर्मितीची प्रक्रिया ते प्रकल्पाचे सादरीकरण

  • संशोधनाच्या कल्पनांना व्यावसायिक रूप देण्यासाठी विद्यापीठात ‘एमयू आयडियाज’सह कलीना, ठाणे आणि रत्नागिरी येथे नवोपक्रम व उद्योजकता केंद्रांच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. संशोधन, नवोपक्रम आणि उद्योजकता यांची सांगड घालत कल्पनांचे उत्पादन, सेवा किंवा स्टार्टअपमध्ये रूपांतर करण्यावर विद्यापीठाचा भर असल्याचेही कुलगुरूंनी यावेळी नमूद केले.
  • ‘अविष्कार’च्या विशेष कार्याधिकारी डॉ. मिनाक्षी गुरव यांनी संशोधन स्पर्धेची पार्श्वभूमी विशद केली. नाविन्यपूर्ण प्रकल्प निर्मितीची प्रक्रिया ते प्रकल्पाचे सादरीकरण या संपूर्ण प्रक्रियेचा प्रवास त्यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून संशोधक विद्यार्थ्यांसमोर उलगडून दाखविला. या विशेष बैठकीला प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे आणि विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील उपस्थित होते.