मुंबई : गुजरात येथील सकलचंद पटेल विद्यापीठात ३० ते ३१ ऑक्टोबरदरम्यान झालेल्या अखिल भारतीय वेस्ट झोन आंतरविद्यापीठ पुरुष वेटलिफ्टिंग स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत एक सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्यपदकांची कमाई केली. या स्पर्धेत ४६ विद्यापीठांचे संघ सहभागी झाले होते.
मुंबई विद्यापीठाच्या ओमकार कदम याने ९५ किलो वजनी गटात तब्बल ३०० किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. सार्थक जाधवने ११० किलोपेक्षा अधिक वजनी गटात २९५ किलो वजन उचलून रौप्यपदक मिळवले. अनुश लोखंडेने ६५ किलो वजनी गटात २३९ किलो वजन उचलून कांस्यपदक, तर मंथन पाटीलने ७५ किलो वजनी गटात २७९ किलो वजन उचलून कांस्यपदकाची कमाई केली. याशिवाय पार्थ पालने ६० किलो वजनी गटात चौथा क्रमांक, तर सानिध्य मोरे याने पाचवा क्रमांक मिळवत स्पर्धेत आपली छाप पाडली. मुंबई विद्यापीठाच्या सात खेळाडूंनी विविध वजनी गटांत सहभाग नोंदवला होता.
या स्पर्धेत मुंबई विद्यापीठाकडून विविध गटांमध्ये सात खेळाडू सहभागी झाले होते. संघ व्यवस्थापक सुरेश चेडे आणि प्रशिक्षक मोहनीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने हे यश मिळविले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे आणि क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी यांनी सर्व विजेत्यांचे, तसेच संघातील खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
