मुंबई : महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेतील नोंदणीकृत ५० महिला बचत गटांच्या उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री मेळावा भरवण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग यांच्या वतीने आयोजित या दोन दिवसीय ‘महिला कौशल्य विकास’ मेळाव्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. विद्यानगरी संकुलातील मराठी भाषा भवन परिसरात या मेळाव्याचे उद्घाटन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.
‘महिला कौशल्य विकास’ मेळाव्यात सहभागी झालेल्या ५० बचत गटांतील महिलांनी स्वयं प्रेरणेने बनवलेली आभूषणे, कापडी पिशव्या, शिल्पकला, महिलांसाठीच्या कार्यालयीन कामकाजाच्या पर्स, बॅग, कूड फेब्रिक ज्वेलरी, सजावटीच्या वस्तू, मुखवास, साबण, तेल, बिस्कीट, फॅन्सी चप्पल व विविध खाद्यपदार्थ अशी निरनिराळी उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे महिलांमधील कौशल्याला व्यावसायिक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. शैक्षणिक प्रगतीसह सामाजिक बांधिलकी जपणारा हा विद्यापीठाचा एक स्तुत्य उपक्रम ठरत आहे. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेल्या या पावलाचे कौतुक करताना मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे महिलांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीला बळ मिळत असल्याचे सांगून विभागाचे अभिनंदन केले. यावेळी विभागाचे संचालक प्रा. बळीराम गायकवाड, अधिसभा सदस्या रुची माने, प्रा. कुणाल जाधव आणि डॉ. विश्वंभर जाधव उपस्थित होते.
मुंबई विद्यापीठ व मुंबई महानगरपालिका नोंदणीकृत महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी आर्थिक सबलीकरण व आर्थिक स्वावलंबनासाठी स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना आहेत. या व्यापक दृष्टिकोनातून आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्यावतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होऊन महिलांनी अत्यंत काळजीपूर्वक, कष्टाने व स्वयं प्रेरणेने बनवलेल्या उत्पादनाची खरेदी करावी असे आवाहन मुंबई विद्यापीठाने केले आहे.
मेळाव्यामध्ये उपलब्ध उत्पादने
‘महिला कौशल्य विकास’ मेळाव्यात सहभागी झालेल्या ५० बचत गटांतील महिलांनी स्वयं प्रेरणेने बनवलेली आभूषणे, कापडी पिशव्या, शिल्पकला, महिलांसाठीच्या कार्यालयीन कामकाजाच्या पर्स, बॅग, दागिने, सजावटीच्या वस्तू, मुखवास, साबण, तेल, बिस्कीट, चप्पल व विविध खाद्यपदार्थ अशी निरनिराळी उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
