मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील काही भागात शुक्रवारपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद होत असून उपनगरातील काही भागात शनिवारी पहाटे पावसाची नोंद झाली. पावसामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. मागील काही दिवसांपासून कमाल तापमानातही घट झाली असून उन्हाची तीव्रता काहीशी कमी झाली आहे. शहरात आणि उपनगरात रविवारीही ढगाळ वातावरण राहील, तसेच हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मुंबईसह संपूर्ण उत्तर कोकण प्रदेशात ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून तीव्र उष्णता कायम होती. त्यामुळे नागरिकांना दीर्घ काळ उकाड्याचा सामना करावा लागला. मुंबईत मागील दोन दिवसांपासून पावसाळी वातावरणामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळताना दिसत आहे. शहरात आणि उपनगरात शुक्रवारी अनेक भागात पावसाची नोंद झाली होती. तसेच उपनगरांमध्ये शनिवारी पावसाचा जोर काहीसा अधिक होता. हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात शनिवारी १०.२ मिमी पावसाची नोंद झाली. हवेच्या वरच्या थरात पश्चिमेकडून कोरडे वारे वाहत आहेत, तर खालच्या थरात

बंगालच्या उपसागराकडून बाष्पयुक्त वारे येत आहेत. यामुळे महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी ‘बाष्प अभिसरण’ वाढले आहे. त्यामुळे राज्यभरात सध्या बहुतांश भागात हवामान ढगाळ असून काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद होत आहे, असे हवामान विभागाने सांगितले.

मागील अनेक दिवसांपासून मुंबईसह उपनगरात सरासरीहून अधिक कमाल तापमान नोंदले जात होते. मात्र, दोन ते तीन दिवसांपासून कमाल तापमानात घट झाली आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शनिवारी ३२.४ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ येथे ३४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. जे सरासरी कमाल तापमानहून कमी होते. राज्याच्या कमाल तापमानात पुढील काही दिवसात २ ते ३ अंश सेल्सिअसने, तर किमान तापमानात १ ते २ अंश सेल्सिअस वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबई आणि उपनगरात रविवारी कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.