मुंबई : भारतीय लष्कर, नौसेना आणि वायूसेना संयुक्तपणे सांभाळत असलेल्या युनायटेड सर्व्हिसेस क्लब म्हणजेच यूएस क्लबमध्ये तेथील महिला अधिकाऱ्याने ७७ कोटींची अफरातफर केल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने नव्याने १७ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. या प्रकरणात संचालनालयाने आतापर्यंत ५० कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.

या क्लबच्या वित्त विभागाच्या उप-सचिव बर्नडेट वर्मा यांनी पती भरतकुमार वर्मा यांच्या संगनमताने हा घोटाळा केल्याचे उघड झाले आहे. या क्लबच्या नियमित विक्रेत्यांच्या नावाशी मिळतेजुळते नाव असलेली विविध बनावट (डमी) बँक खाती उघडली. त्यानंतर, त्यांनी क्लबचा सुमारे ७७ कोटी रुपयांचा निधी अशा बनावट खात्यांमध्ये वळवला. गुन्ह्यातून मिळवलेली ही रक्कम बर्नडेट वर्मा, भरत वर्मा आणि त्यांचे कुटुंबीय तसेच सहयोगी यांच्या वैयक्तिक किंवा संयुक्त बँक खात्यांमध्ये वळवण्यात आली. हा प्रकार क्लब व्यवस्थापनाच्या लक्षात आल्यानंतर कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याच गुन्ह्याचा आधार घेऊन सक्तवसुली संचालनालयाने चौकशी सुरु केली होती. त्यावेळी या पैशाचा वापर करुन वर्मा दाम्पत्याने अनेक स्थावर मालमत्ता खरेदी केल्या. त्यातील काही रक्कम विविध बँकांमध्ये मुदत ठेवींमध्येही गुंतवली. मार्च महिन्यातही संचालनालयाने वर्मा कुटुंबीयांशी संबंधित काही मालमत्ता तसेच आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केली होती. ३४ कोटी रुपये किमतीच्या ३५ मालमत्ता जप्त केल्या होत्या.

यामध्ये मुंबई, दिल्ली तसेच देशात अन्यत्र खरेदी केलेल्या मालमत्तांचा समावेश होता. नव्याने केलेल्या कारवाई आणखी मालमत्ता सील करण्यात आली आहे. मुंबई विभागाने मुंबईसह गोवा आणि मध्य प्रदेशात एकूण १३ ठिकाणी छापे टाकले. क्लबच्या वित्त विभागाच्या उपसचिव बर्नाडेट भरत वर्मा, त्यांचे पती भरतकुमार शंकरलाल वर्मा आणि अन्य संबंधितांशी निगडित ठिकाणी छापे घालण्यात आले. छापेमारीत फ्लॅट, जमीन, बँकेतील रोख रक्कम आणि मुदत ठेवी अशा एकूण १३.४४ कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत.

याव्यतिरिक्त, या गुन्ह्यातून मिळालेली सुमारे ११ कोटी रुपयांची रक्कम ‘मेसर्स ज्योतीर्गमय फौंडेशन’च्या (ट्रस्ट) बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आली. हे फौंडेशन वर्मा कुटुंबीयांशी संबंधित असल्याचेही तपासात उघड झाले. या खात्यातील रक्कम पुढे चंद्र प्रकाश पांडे आणि त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या नियंत्रणाखालील संस्था (तसेच संबंधित व्यक्ती) यांच्या बँक खात्यांमध्ये वळवण्यात आली. पांडे हे क्लबचे चार्टर्ड अकाउंटंट होते. बेर्नडेट यांनी पांडे यांच्याशी संगनमत करुन हा गैरव्यवहार केला का, याची संचालनालयाकडून चौकशी केली जात आहे. गेले काही महिने हा प्रकार सुरु होता, असेही स्पष्ट झाले आहे.

यू एस क्लब काय?

यूएस क्लब, मुंबई (युनायटेड सर्व्हिसेस क्लब) हा कुलाबा (नेव्ही नगर) भागात असलेला प्रतिष्ठित आणि ऐतिहासिक मिलिटरी क्लब आहे. या क्लबची स्थापना १९३७ मध्ये भारतीय लष्कराने केली. सध्या भारतीय लष्कर, नौदल आणि वायुसेना संयुक्तपणे या क्लबचे व्यवस्थापन पाहतात. दक्षिण मुंबईत समुद्रकिनाऱ्यावर असलेला गोल्फ कोर्स येथे आहे. क्लबला लागूनच अरबी समुद्राचा सुमारे एक किलोमीटर लांब नयनरम्य किनारा आहे. हा क्लब प्रामुख्याने सशस्त्र दलातील अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी राखीव आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी या क्लबचे नवीन सदस्यत्व २००१ पासून बंद करण्यात आले आहे.