शुक्रवारी अमेरिकेतून परतलेल्या २९ वर्षीय व्यक्तीला करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झाल्याचे आढळून आल्याची माहिती बृहन्मुंबई पालिकेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या व्यक्तीने फायझरच्या कोविड लसीचे तीन डोस घेतले आहेत. मात्र, त्या व्यक्तीमध्ये करोनाची कोणतीही लक्षणे नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विमानतळावर नऊ नोव्हेंबर रोजी झालेल्या करोना चाचणीत या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता, त्यानंतर त्याचा नमुना जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आला होता. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या दोन लोकांचा अहवाल निगेटिव्ह आल्याचेही बीएमसीने सांगितले. बीएमसीच्या म्हणण्यानुसार, ‘रुग्णाला खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यामध्ये करोनाची कोणतीही लक्षणे नाहीत.’

यानंतर आता देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कोरोनाच्या ओमायक्रॉन रुग्णांची एकूण संख्या १५ झाली आहे. मात्र, यापैकी १३ रुग्णांना आता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. बीएमसीने असेही म्हटले आहे की आतापर्यंत संक्रमित १५ ओमिक्रॉनपैकी कोणालाही गंभीर लक्षणे दिसून आलेली नाहीत. मात्र, महाराष्ट्रात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या आता ४० झाली आहे.

दरम्यान, देशातील ‘ओमायक्रॉन’ची रुग्णसंख्या शंभरावर पोहोचली असून केंद्रीय आरोग्य विभागाने याबाबत शुक्रवारी चिंता व्यक्त करीत खबरदारीचा इशारा दिला. गर्दी, अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि नववर्ष स्वागत कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरे न करण्याचे आवाहन सरकारने केले आहे.

देशातील ११ राज्यांतील ओमायक्रॉनची संख्या शुक्रवारी १०१वर गेली. त्यात ४० रुग्ण एकट्या महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्रात शुक्रवारी ओमायक्रॉनचे नऊ रुग्ण आढळले. त्यात पुणे जिल्ह्यातील सात रुग्णांचा समावेश आहे. सर्वाधिक ओमायक्रॉनबाधित रुग्ण मुंबईत आहेत. मुंबईतील रुग्णांची संख्या आता १५ झाली आहे. तसेच पिंपरी-चिंचवडमध्ये १०, पुणे ग्रामीणमध्ये सात, पुणे शहर, कल्याण-डोंबिवली आणि  उस्मानाबाद येथे प्रत्येकी दोन रुग्ण आहेत. बुलढाणा, नागपूर, लातूर आणि वसई-विरार येथे प्रत्येकी एक रुग्ण आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai us returned man omicron positive bmc says taken three doses vaccine abn
First published on: 18-12-2021 at 09:18 IST