मुंबई : भेसळयुक्त दुधाचा पुरवठा करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना चाप बसविण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) वारंवार कारवाई केली जाते. मागील आठवडाभरापासून एफडीएने दूध भेसळकरणाऱ्यांविरोधात मोहीम तीव्र केली आहे. एफडीएने गुन्हे प्रकटीकरण शाख युनिट क्रमांक ९ च्या मदतीने वर्सोवा येथे कारवाई करून दुधात भेसळ करणाऱ्या पाच जणांना अटक केली.

पहाटे ४.३० वाजता कारवाई

वर्सोवा परिसरात दुधात भेसळ करण्यात येत असल्याची माहिती एफडीएच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. एफडीएचे अन्न सुरक्षा अधिकारी आणि गुन्हे प्रकटीकरण शाख युनिट क्रमांक ९ ने संयुक्तरित्या ९ एप्रिल रोजी पहाटे ४.३० वाजता चार ठिकाणी छापे टाकले. एफडीएचे सहआयुक्त म. ना. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त (अन्न) डॉ. भुषण मोरे यांच्या सूचनेनुसार अन्न सुरक्षा अधिकारी ऋतुजा जाधव, रामू माळी, श्रीपाद धरंगुट्टी व प्रतीक्षा मसुगडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

छाप्यात ६२१ लिटर दूध केले नष्ट

या पथकाने दुधात भेसळ करणाऱ्या पाच जणांना छाप्यादरम्यान अटक केली. या पाचही जणांविरोधात वर्सोवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. एफडीए व पोलिसांनी केलेल्या या कारवाईत दुधाचे ८ नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. तसेच ३६ हजार २१९ रुपये किमतीचे ६२१ लिटर दूध नष्ट करण्यात आले.

मुंबई सीमेवर केली होती कारवाई

मुंबई शहर व उपनगरात बाहेरून येणाऱ्या दुधाच्या गाड्यांची मागील आठवड्यामध्ये शहराच्या सीमेवरील टोल नाक्यांवर रात्री विशेत तपासणी करण्यात आली. या विशेष तपासणी मोहिमेमध्ये मुलुंड (आनंद नगर), (एलबीएस), ऐरोली, मानखुर्द, दहिसर आणि शिवडी या ६ ठिकाणी एफडीएच्या पथकाने कारवाई केली. रात्रभर चाललेल्या या मोहिमेत एफडीएच्या पथकांनी ११,०८०.५ लिटर दुधाचा साठा जप्त केला. यामध्ये निकृष्ट दर्जाच्या दुधाचा साठा सील करून उत्पादकांकडे परत पाठविण्यात आला. तसेच ९० लिटर असुरक्षित साठा तात्काळ नष्ट करण्यात आला. या कारवाईमध्ये एफडीएच्या पथकाने एकूण १९५ नमूने ताब्यात घेतले. त्यापैकी तपासणीनंतर १८८ नमूने प्रमाणित, ६ नमूने निकृष्ट व एक नमूना असुरक्षित आढळून आला.

नागरिकांना आवाहन

नागरिकांना दर्जेदार दूध उपलब्ध व्हावे यासाठी एफडीएकडून अधूनमधून अशा प्रकारच्या मोहिमा राबविण्यात येतात. नागरिकांना सकस आहाराचा पुरवठा व्हावा यासाठी एफडीए कटिबद्ध आहे. नागरिकांनी संशयास्पद अन्नपदार्थांबाबत विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन एफडीएकडून करण्यात आले आहे.