मुंबई : विद्याविहार येथील उड्डाणपुलाची मुदत पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. यापूर्वी हा पूल ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले होते. मात्र आता या पुलासाठी ३१ ऑगस्टची नवीन मुदत निश्चित करण्यात आली आहे. या उड्डाणपुलाचे काम २०१८ पासून हाती घेण्यात आले असून आतापर्यंत ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. तर मानखुर्द महाराष्ट्र नगर उड्डाणपुलाचे काम पूर्ण होण्यास आणखी एक वर्ष वाट पाहावी लागणार आहे.
मानखुर्द – महाराष्ट्र नगर आणि विद्याविहार रेल्वे स्थानक या दोन्ही उड्डाणपुलांच्या कामांची शनिवारी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी पाहणी केली. यावेळी पूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. विद्याविहार पूर्व आणि पश्चिम परिसराला जोडणारा आणि विद्याविहार रेल्वे स्थानकावरून जाणारा उड्डाणपूल मुंबई महानगरपालिका बांधत आहे.
महानगरपालिकेच्या पूल विभागाने हा प्रकल्प हाती घेतला आहे. पुलाचा आराखडा २०१६ मध्ये तयार करण्यात आला होता. मे २०१८ रोजी पुलाच्या बांधकामाचा कार्यादेश देण्यात आला. हा पूल २०२२ मध्ये बांधून तयार होणार होता. मात्र विविध कारणांमुळे या पुलाचे काम गेल्या काही वर्षांपासून रखडलेले आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या संशोधन, डिझाइन आणि मानक संस्थेने (आरडीएसओ) पुलाच्या डिझाईनमध्ये बदल सुचवले. यामुळे रेल्वे हद्दीतील आराखड्यात बदल करावा लागला. त्याचबरोबर पुलाच्या पूर्व आणि पश्चिम भागातही बदल करावे लागले. तसेच करोना व टाळेबंदीमुळे पुलाचे काम रखडले होते. त्याचप्रमाणे प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम करीत असताना पर्जन्य जलवाहिन्यांचे रुंदीकरण, रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूंच्या तिकीट खिडकी कक्षांचे स्थानांतरण, प्रकल्पाच्या रेषेत आलेली अतिक्रमणे निष्कासित करणे, कामासाठी रेल्वे ब्लॉक घेणे अशा अडथळ्यांमुळे प्रकल्पाचे काम रखडल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.
विद्याविहार उड्डाणपूलाविषयी…
लालबहादूर शास्त्री मार्ग व रामचंद्र चेंबूरकर मार्ग यांना जोडणारा हा उड्डाणपूल एकूण दोन मार्गिकांचा आहे. एकूण ६५० मीटर लांबीच्या या प्रकल्पात रेल्वे रुळांवर १०० मीटर पूल, तर पूर्व बाजूस २२० मीटर आणि पश्चिम बाजूला ३३० मीटर पोहोच मार्ग बांधण्यात येत आहे. या उड्डाणपुलावरून विद्याविहार रेल्वे स्थानकाच्या फलाटावर जाण्यासाठी जोडमार्ग देखील दिला जात आहे. त्यासोबतच दोन्ही बाजूचे रेल्वे तिकीट खिडकी कक्ष, स्थानक मास्तर कार्यालय, जीना यांची देखील पुनर्बांधणी केली आहे.
मानखुर्द – महाराष्ट्र नगर उड्डाणपुलाची आवश्यकता…
मानखुर्द – महाराष्ट्र नगर टी जंक्शन येथे नियमित सकाळी आणि रात्री मोठ्या स्वरूपात वाहतूक कोंडी होते. परिणामी, स्थानिक रहिवाशांसह मुंबईवरून वाशीकडे, तसेच वाशीकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. यासोबतच घाटकोपर – मानखुर्द आणि मानखूर्द – घाटकोपर या मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण होते.
यावर परिणामकारक उपाय म्हणून मुंबई महानगरपालिकेने घाटकोपर – मानखुर्द उड्डाणपुलावरून थेट वाशीकडे जाणारा आर्म – १ आणि शीव – पनवेल महामार्गावरील मानखुर्द उड्डाणपूल येथून घाटकोपरकडे जाणारा आर्म- २ उड्डाणपूल अशी स्वतंत्र मार्गिका तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. अतिरिक्त मनुष्यबळ आणि संयंत्रे वापरून दोन्ही आर्मचे काम ३१ मे २०२७ पर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश अभिजीत बांगर यांनी दिले. पूल प्रकल्पाच्या अनुषंगाने महावितरण व टाटा पॉवर यांच्या पारेषण वाहिन्यांच्या स्थलांतराच्या कामाचा आढावादेखील बांगर यांनी घेतला.
