मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी ‘विहार तलाव’ मंगळवारी ७ जुलै रोजी रात्री ९ वाजता ओसंडून वाहू लागला. हा तलाव गेल्यावर्षी, १८ ऑगस्ट २०२५ रोजी पूर्ण भरून वाहू लागला होता. गेल्या दोन-तीन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे मुंबईच्या हद्दीतील हा तलाव ओसंडून वाहू लागला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांपैकी विहार आणि तुळशी हे दोन तलाव मुंबईच्या हद्दीत आहेत. मुंबईत जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मोठ्या पावसामुळे विहार तलावाची पातळी चांगलीच वाढली होती.
त्यातच मंगळवारी हा तलाव भरून वाहू लागला. मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी विहार आणि तुळशी हे दोन्ही तलाव मुंबईच्या हद्दीत आहेत. हे दोन्ही तलाव लहान आहेत. या तलावाची जलधारण क्षमता २७,६९८ दशलक्ष लिटर आहे. हा तलाव २०२४ मध्ये २५ जुलै रोजी ओसंडून वाहू लागला होता. तर त्याआधीच्या वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये २६ जुलै रोजी विहार तलाव ओसंडून वाहू लागला होता.
विहार तलावातून दररोज सरासरी ९० दशलक्ष लिटर (९ कोटी लिटर) एवढ्या पाण्याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसांत या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.
विहार तलावाबाबत…..
बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे २८.९६ किलोमीटर अंतरावर हा तलाव आहे.
या तलावाचे बांधकाम सन १८५९ मध्ये पूर्ण झाले.
या तलावाच्या बांधकामासाठी सुमारे ६५.५ लाख रुपये एवढा खर्च तेव्हा आला होता.
या तलावाचे पाणलोट क्षेत्र सुमारे १८.९६ चौरस किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ सुमारे ७.२६ चौरस किलोमीटर एवढे असते.
तलाव पूर्ण भरलेला असताना तलावाचा उपयुक्त पाणीसाठा २७,६९८ दशलक्ष लिटर अर्थात २,७६९.८० कोटी लिटर एवढा असतो.
हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी मिठी नदीला जाऊन मिळते.
