विजयदुर्ग : प्रयोगिक तत्त्वावरील मुंबई ते विजयदुर्ग रो रो सेवेची रविवारी मुंबईतील भाऊचा धक्का येथून मुहूर्ताची फेरी सुटली. पहिल्यांदाच प्रवाशांना मुंबई ते विजयदुर्ग असा प्रवास वातानुकूलित अत्याधुनिक बोटीतून करता येणार असल्याने प्रवाशांमध्ये उत्साह होता. मात्र प्रवास दीड तास लांबल्याने प्रवाशांचा हा उत्साह काहीसा मावळला. जलमार्गावरील वाहतूक कोंडीमुळे दीड तासाचा विलंब झाला आणि दुपारी ३ वाजता विजयदुर्गला बोट पोहचणे अपेक्षित असताना बोट दुपारी ४.३० वाजता पोहचली. मुहूर्ताच्या फेरीला विलंब झालाच पण दुसरीकडे भरमसाठ तिकीट दर आणि बोटीवरील महागडी खानपान सेवा यामुळे प्रवास महागडा ठरल्यानेही प्रवाशांचा काहीसा हिरमोड झाला. तिकीट दर कमी करण्याची मागणी यानिमित्ताने उचलून धरली.
मुंबई ते कोकण प्रवास अतिजलद करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने मुंबई ते विजयदुर्ग रो रो सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आवश्यक ती प्रक्रिया पार करून, विजयदुर्ग प्रवासी जेट्टीचे रो रो जेट्टीत रूपांतर करून ऑगस्ट २०२५ मध्ये रो रो सेवा सुरू करण्याचे जाहिर केले. मात्र तांत्रिक कारणाने लांबलेल्या या सेवेला अखेर १ मार्चचा मुहूर्त लागला. रविवारी सकाळी ८ वाजता मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सेवेचा आरंभ करण्यात आला. त्यानंतर भाऊचा धक्का येथून सकाळी साडे आठ वाजता बोट ५०० हुन अधिक प्रवाशांना घेऊन विजयदुर्गच्या दिशेने निघाली. नियोजित वेळापत्रकानुसार बोट दुपारी ३ वाजेपर्यंत विजयदुर्गला पोहचणे अपेक्षित होती. मात्र प्रवास दीड तासाने लांबला आणि बोट विजयदुर्गला दुपारी ४.३० वाजता पोहचली. मुहूर्ताच्या फेरीचाच प्रवास लांबल्याने प्रवाशांचा काहीसा हिरमोड झाला. मात्र पहिलाच दिवस असल्याचे तसेच जलमार्गावरील वाहतुक कोंडीचा फटका बसल्याचे कारण सागरी मंडळाकडून देण्यात आले.
मुंबई ते विजयदुर्ग रो रो सेवा प्रयोगिक तत्त्वावर महिन्याभरासाठी चालविली जाणार. या महिन्याभरात आठवड्याला एकूण चार फेऱ्या होणार आहेत. दोन फेऱ्या मुंबई ते विजयदुर्ग आणि विजयदुर्ग ते मुंबई दोन फेऱ्या अशा या चार फेऱ्या असतील. या महिन्याभरात ही सेवा यशस्वी ठरली तर सेवा कायमस्वरूपी करण्यात येणार आहे. अन्यथा आठवडा किंवा पंधरा दिवसाला एक फेरी धावण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सेवेचे भवितव्य महिन्याभरात ठरणार आहे. पहिल्या दिवसाचा अनुभव आणि महागडा प्रवास पाहता ही सेवा कोकण रेल्वेच्या रो रो सेवेप्रमाणे फसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अतिजलद वंदे भारतसह विमान सेवा असताना वंदे भारत आणि विमानसेवेपेक्षा महाग आणि वेळखाऊ प्रवास का असा प्रश्न ही काही प्रवाशांनी उपस्थित केला. तर जर ही सेवा कायमस्वरूपी ठेवायची असेल, त्याला प्रतिसाद वाढवायचा असेल तर तिकीट दर कमी करणे आवश्यक असल्याचे सांगून प्रवाशांनी तिकीट दर कमी करण्याची मागणी केली. तेव्हा आता या मागणीचा राज्य सरकार आणि सागरी मंडळाकडून विचार होतो का आणि ही सेवा मुंबई ते कोकण प्रवासासाठी अतिजलद वाहतुकीचा पर्याय ठरते का हे महिन्याभरात स्पष्ट होईल.
नेटवर्क नसल्याने गैरसोय
बोटीवरील सहा तासाचा प्रवास आठ तासांवर गेला. त्यात बोटीवर मोबाईल नेटवर्क नसल्याने प्रवाशांना मोबाईलचा वापर करता आला नाही. कोणाशी संपर्क साधता आला नाही. नेटवर्क नसल्याने डिजिटल पेमेंटचा पर्याय उपलब्ध झाला नाही. त्यामुळे खानपानासाठी रोकड पध्दतीने व्यवहार करावा लागला. ज्यांच्याकडे रोकड नव्हती त्यांची गैरसोय झाली. त्यामुळे यापुढे रो रो ने कोकण प्रवास करणाऱ्यानी रोकड जवळ बाळगणे आवश्यक ठरणार आहे.
मी ४० वर्षांपूर्वी पारंपरिक होडीने मुंबई ते कोकण प्रवास केला आहे. आता अत्याधुनिक बोटीने कोकणात जात आहे. काही तासात कोकणात पोहचणार आहे. त्यामुळे मी आनंदी आहे. एक चांगला पर्याय आता कोकणात जाण्यासाठी उपलब्ध झाला आहे ही बाब दिलासादायक आहे.-जयवंती शिंदे, प्रवास
रो रो प्रवास अतिजलद आणि सुकर आहे. पण विमानपेक्षा ही महागडा आहे. बोटीवरील खानपान सेवा प्रचंड महाग आहे. मोबाईल नेटवर्कचा पत्ता नाही. या सर्व बाबींचा विचार करता या सेवेला पुढे कसा प्रतिसाद मिळेल हा एक प्रश्नच आहे. या सेवेचा लाभ सर्वसामान्यांना घेता यावा यासाठी तिकीट कमी करणे अत्यावश्यक आहे अशी प्रतिक्रिया एका प्रवाशाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
विजयदुर्ग जेट्टीवर बोटीचे जल्लोषात स्वागत
तब्बल ४५ वर्षानंतर विजयदुर्गवरून प्रवासी बोट मुंबईवरून विजयदुर्ग जेट्टीवर येणार असल्याने नागरिकांनी मोठ्या संख्येने जेट्टीवर गर्दी केली होती. ढोल ताशाच्या तलावर बोटीचे आणि प्रवाशांचे स्वागत यावेळी स्थानिकांनी केले.
