मुंबई : मोठा गाजावाजा करून सेवेत दाखल करण्यात आलेली मुंबई ते विजयदुर्ग रो-रो सेवा महिन्याभरात स्थगित करण्यात आली आहे. एमटूएम प्रिन्सेस या जहाजाच्या चारपैकी तीन इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रो-रो सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्याची वेळ महाराष्ट्र सागरी मंडळावर आली आहे. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर सेवा पूर्ववत केली जाणार आहे.

मुंबई ते कोकण प्रवास अतिजलद करण्यासाठी सागरी मंडळाने मुंबई ते विजयदुर्ग रो-रो सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ६२६ प्रवासी क्षमतेचे एमटूएम प्रिन्सेस जहाज मुंबई ते विजयदुर्ग जलमार्गावर सुरू करण्यासाठी आवश्यक त्या चाचण्या घेण्यात आल्या. चाचण्या यशस्वी झाल्यानंतर १ मार्चला मुंबई ते विजयदुर्ग रो-रो सेवेचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर दर बुधवार आणि शनिवार मुंबईच्या भाऊचा धक्का येथून सकाळी ८ वाजता जहाज सोडण्यात येऊ लागले. गुरुवार आणि रविवार विजयदुर्ग बंदरावरून दुपारी १२ वाजता जहाज सोडण्यात येऊ लागले.

या सेवेमुळे मुंबई ते विजयदुर्ग प्रवास सहा ते सात तासांत करता येऊ लागला. मात्र हा प्रवास प्रचंड महागडा असल्याने त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. ३००० ते ९ हजार रुपये असे तिकिट दर प्रवाशांना परवडणारे नसल्याचेही चित्र आहे. त्यामुळेच ६२६ अशी प्रवासी क्षमता असलेल्या या बोटीतून तुरळक प्रवासी प्रवास करत होते. त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेली ही सेवा पुढे सुरू राहील का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशात आता या सेवेला तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याची माहिती सागरी मंडळाकडून देण्यात आली आहे.

एमटूएम प्रिन्सेस जहाज सहावी फेरी घेऊन विजयदुर्गवरून मुंबईला येत असताना समुद्रातील तरंगत्या कचऱ्यामुळे जहाजाच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. चारपैकी तीन इंजिन काम करत नसल्याने त्यांची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक होते. त्यामुळे मुंबई ते विजयदुर्ग रो-रो सेवा काही काळासाठी स्थगित करण्यात आल्याचे सागरी मंडळाने सांगितले. दुरुस्ती पूर्ण करण्यासाठी किमान १० दिवसांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे १० दिवसांनंतर ही सेवा सुरू होते का, हे पाहणे आवश्यक असणार आहे. दरम्यान, या सेवेला प्रतिसाद मिळत नसल्याने सेवा यापुढे सुरू होईल की नाही, अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे.