मुंबई : नवी मुंबई, नाशिकसह मुंबईतील अनेक परिसरात सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात सहभागी आरोपीचा ७५ सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या साह्याने माग काढून त्याला मध्य प्रदेशातून अटक करण्यात विक्रोळी पोलिसांना यश आले आहे. आरोपीविरोधात यापूर्वी जबरी चोरीचे २५ गुन्हे दाखल असून आरोपीच्या अटकेमुळे १० पेक्षा अधिक गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

विक्रोळी पोलिसांच्या हद्दीतील भांडूप पेट्रोलपंपाजवळ पूर्व द्रुतगती मार्गावर एका ३९ वर्षीय दुचाकीस्वाराची सोनसाखळी चोरून तो ठाण्याच्या दिशेने पळाला होता. या घटनेनंतर . पोलीस उपायुक्त (परिमंडळ-७) पुरुषोत्तम कराड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर हिर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील क्षीरसागर व गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शंकर पाटील, पंकज पाटील यांची वेगवेगळी पथके तयार करून संबंधीत गुन्ह्याचा तपास सुरू केला.

हेही वाचा…Wife Circulates Intimate Video : पतीचे विवाहबाह्य संबंध, पत्नीने व्हायरल केले खासगी फोटो; तक्रारदार महिला म्हणते, “घरी कोणी नसताना…”

तपास पथकाने घटना स्थळापासून सीसीटीव्ही पाहण्यास सुरुवात केली असता गुन्ह्यातील आरोपी हा मोटारसायकल वरून ठाण्याच्या दिशेने गेल्याचे दिसून आले. त्यानुसार त्या मोटर सायकलचा माग काढण्यासाठी पोलीस पथकाने ठाणे पोलिस आयुक्तालयातील व कल्याण परिसरातील शासकीय व खासगी असे साधारण ७५ सीसीटीव्ही कॅमेरांचे चित्रण तपासले. आरोपी आंबिवली मध्ये गेल्याचे दिसले. तपासणीत तो सराईत आरोपी मोहम्मद सय्यद असल्याचे पोलिसांना समजले.

हेही वाचा…मुंबईतून ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी सहा लाख अर्ज; प्रतितास ४० अर्जांची छाननी करण्याचे आदेश

त्यानंतर आरोपीचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. मोहम्मद सय्यद हा मुंबई, नवी मुंबई, ठाणे व नाशिक परिसरात सलग काही दिवस गुन्हे करुन परराज्यात जातो. त्यानंतर तांत्रिक तपासात आरोपी मध्यप्रदेश येथे गेला असल्याचे समजले. त्यानुसार पोलीस पथक तात्काळ मध्य प्रदेशात रवाना झाले. मध्यप्रदेशमध्ये आरोपीचा शोध घेत असताना आरोपी भोपाळहून उतरप्रदेशला राष्ट्रीय महामार्ग ४५ मार्गे जात असल्याचे समजले. त्यानुसार एनएच ४५ या महामार्गावर साधारण १५० किलोमीटर आरोपीचा पाठलाग करुन त्यास हर्षिली टोल प्लाज़ा येथे शिताफीने मोहम्मद कबीरशहा सय्यद ऊर्फ सलमान (३२) याला पकडण्यात आले.