मुंबई : एकीकडे पीओपीच्या उंच गणेशमूर्तींसाठी गणेशोत्सव मंडळांमध्ये स्पर्धा सुरू असताना विलेपार्ले येथील बाळ गोपाळ मित्र मंडळाने गेल्या १८ वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची परंपरा जपली आहे. गतवर्षी विसर्जीत केलेल्या गणेशमूर्तीतून प्राप्त झालेला कागदाचा लगदा आणि टिश्यू पेपरचा पुनर्वापर करून यंदा मंडळाने तब्बल २५ फूट उंच ‘मुंबईचा पेशव्या’ची गणेशमूर्ती साकारली आहे. शास्त्र, विद्या, संगीत आणि साधनेचा संगम साधणाऱ्या या मूर्तीने भाविकांना चांगलीच भुरळ घातली आहे.

विलेपार्ले येथे १९८९ मध्ये स्थापन झालेल्या बाळ गोपाळ मित्र मंडळाने २००८ मध्ये पीओपीमुळे पर्यावरणाला पोहोचणारी हानी लक्षात घेऊन पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. सुरुवातीची तीन वर्ष मंडळाला अत्यंत आव्हानात्मक गेली. अनेक योजना फसल्या, टीका झाली. मात्र, सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर चौथ्या वर्षी मंडळाला पर्यावरणपूरक सुबक मूर्ती बनविण्यात यश आले. घाटी गम, बारीक तारा, डिंक आणि टिश्यू पेपरचा वापर करून गेली अनेक वर्षे मंडळाकडून पर्यावरणपूरक मूर्ती साकारण्यात येत आहे.

पूर्वी गणपतीच्या मूर्तीच्या शेकडो भाग बनवून मूर्ती साकारली जायची. मात्र, आता केवळ दोन भागांमध्येच मूर्ती बनवून पूर्ण होते. यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे ३७ वे वर्ष असून मूर्तिकार आणि मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक दिगंबर मयेकर आणि राजेश मयेकर यांच्या कल्पकतेतून संगीत, साधना आणि शास्त्र या संकल्पनेवर गणपतीची मूर्ती साकारण्यात आली आहे. ऋषीमुनी, सरस्वती आणि गणपती अशा तीन मूर्तींचा मेळ घालून बनवलेली २५ फूट उंच मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.

पर्यावरणपूरक विसर्जन प्रक्रिया

पर्यावरणपूरक पद्धतीने मूर्ती बनविण्यासोबतच मूर्तीचे विसर्जन देखील पर्यावरणाला कोणतीही हानी न पोहोचवता केले जाते. जलप्रदूषण रोखण्यासाठी तसेच पाण्याचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी मूर्तीचे कृत्रिम तलावात विसर्जन केले जाते. मूर्तीवर आवश्यकतेनुसार पाणी शिंपडले जाते. मूर्ती कागदाची असल्यामुळे काही अवधीतच विसर्जन प्रक्रिया पार पडते. विसर्जनानंतर प्राप्त झालेला कागदाचा लगदा पुढच्या वर्षीच्या गणपती मूर्तीसाठी जमा केला जातो.

चलचित्रातून प्रबोधन

मंडळाची स्थापना झाल्यानंतर पुढील अनेक वर्ष पौराणिक संकल्पनेवर आधारित चलचित्रे गणेशोत्सवात दाखविली जात. मात्र, २००८ नंतर चलचित्रांची संकल्पना देखील सामाजिक प्रश्नांकडे वळविण्यात आली. गतवर्षी गणपतीसोबत गौरी – शंकराची मूर्ती साकारण्यात आली होती.

कुटुंबातील प्रेम, एकोपा दर्शवणारी ती मूर्ती होती. त्यावेळी आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठविण्याबाबतच्या घटनांवर प्रबोधन करण्यात आले होते. त्याशिवाय एड्स, हम सब एक है, खेलो इंडिया (जुगार), नागरी विवेक आदी विविध विषयांवर मंडळाने चलचित्रांच्या माध्यमातून प्रबोधन केल्याचे बाळ गोपाळ मित्र मंडळाचे सचिव अमेय खापले यांनी सांगितले.

पाच वर्षांपासून वेगळे प्रयोग

पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणाऱ्या बाळ गोपाळ मित्र मंडळाने गेल्या पाच वर्षांपासून मूर्ती बनविण्यासाठी विविध प्रयोग केले आहेत. केळीच्या खांबांचा लगदा, तुरटी, कोकोपीट, भाजीपाला आणि टिश्यू पेपर आदींचा वापर करून मूर्ती साकारण्यात येत आहेत.